‘व्हेंटिलेटर्स ’ची सुविधा चार पटीने वाढणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 11:42 AM2020-09-09T11:42:37+5:302020-09-09T11:42:53+5:30
‘व्हेंटिलेटर्स’ची सुविधा चार पटीने वाढविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात अवघ्या महिनाभरात कोरोनाबाधितांची संख्या दीड हजारांनी वाढून २२५० वर पोहोचली. त्यामुळे आरोग्य विभागावर ताण वाढला आहे. आता आवश्यक वेळी गंभीर रुग्णांवर उपचार सोयीचे व्हावेत म्हणून ‘व्हेंटिलेटर्स’ची सुविधा चार पटीने वाढविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जारी केलेले लॉकडाऊन काढून आता अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात अनलॉक-३ च्या अमलबजावणीनंतर कोरोना संसर्गाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. अवघ्या महिनाभरातच जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत दीड हजारांची भर पडली आहे. ही बाब अतीशय गंभीर आहे. त्यातच जनतेमध्ये कोरोना संसर्गाची भीती पूर्वीसारखी राहिली नाही. अनेक जण लक्षणे दिसत असतानाही खबरदारी म्हणून तपासणीसाठी तयार होत नाहीत. असे रुग्ण गंभीर स्थितीत पोहोचल्यानंतर रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर (जीवनदायी प्रणाली) ठेवावे लागते. जिल्ह्यात वाढत असलेल्या रुग्णसंख्येचा विचार करता पुढे परिस्थिती गंभीर होण्याची भीती असते.
यावेळी आरोग्य विभाग आणि प्रशासनाची धांदल होऊन गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये, या उद्देशाने जिल्ह्यात व्हेंटिलेटर्सची संख्या चार पटीने वाढविण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ १० ‘व्हेंटिलेटर्स’ उपलब्ध असून, येत्या काही दिवसांत यात ३५ ‘व्हेंटिलेटर्स’ची भर पडून ती ४५ पर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे अतीगंभीर रुग्णांवर उपचार करणे आरोग्य विभागाला सोयीचे होणार आहे.
‘आॅक्सीजन बेड’ही वाढणार
जिल्ह्चात वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे प्रशासन आवश्यक त्या सर्व उपाय योजना करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेतील सोयीसुविधांत वाढ करणे क्रमप्राप्त असल्याने प्रशासनाने
‘व्हेंटिलेटर्स’ वाढविण्यासह ‘आॅक्सीजन बेड’ची संख्याही वाढविण्याची तयारी केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात शासकीय रुग्णालये, खासगी कोविड सेंटर मिळून कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी १३५० खाटांची सुविधा आहे. त्यात २८० आॅक्सीजन बेड आहेत. आता वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ‘आॅक्सीजन बेड’ची संख्याही वाढविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
जिल्ह्यात वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता पुढील काळात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास उपचारात अडचणी येऊन गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी नियोजन करण्यात येत आहेत. त्यात ‘आॅक्सीजन बेड’, ‘व्हेंटिलेटर्स’सह कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्याची तयारी सुरू असून, येत्या काही दिवसांत जिल्ह्यात एकूण ४५ ‘व्हेंटिलेटर्स’ उपलब्ध असतील.
- शैलेश हिंगे,
निवासी उपजिल्हाधिकारी,
वाशिम