अल्पसंख्याक शाळांमधील प्रवेश प्रक्रियेची पडताळणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 10:49 AM2019-08-21T10:49:28+5:302019-08-21T10:49:32+5:30

अल्पसंख्याक शाळेसह अन्य शाळेतील प्रवेश प्रक्रिया व त्याअनुषंगाने अन्य बाबींची पडताळणी शिक्षण विभागाने सुरू केली.

Verification of admission process in minority schools! | अल्पसंख्याक शाळांमधील प्रवेश प्रक्रियेची पडताळणी!

अल्पसंख्याक शाळांमधील प्रवेश प्रक्रियेची पडताळणी!

Next

- संतोष वानखडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अल्पसंख्याक शाळेसह अन्य शाळेतील प्रवेश प्रक्रिया व त्याअनुषंगाने अन्य बाबींची पडताळणी शिक्षण विभागाने सुरू केली असून, कारंजा येथील एका अल्पसंख्याक शाळेत त्रूटी आढळून आल्या आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते.
अल्पसंख्याक शाळेत नियम डावलून प्रवेश प्रक्रिया, पालक सभा डावलून जादा शुल्क आकारणी, शैक्षणिक साहित्य शाळेने सुचविलेल्या दुकानातूनच घेण्याची सक्ती, क्षमतेपेक्षा जादा प्रवेश आदीसंदर्भात ‘लोकमत’ने जून महिन्यात विविधांगी वृत्त प्रकाशित करून जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले होते. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही जिल्हा परिषद सदस्यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी रेटून धरली होती. तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी याप्रकरणी लवकरच चौकशी समिती गठीत करण्याचे तसेच या विषयाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलाविण्याचे निर्देशही दिले होते. परंतू, त्यानंतर जुलै महिन्यात जिल्हा परिषद पदाधिकारी मंडळ बरखास्त झाल्याने जिल्हा परिषदेची विशेष सभा होऊ शकली नाही.
दरम्यान, शिक्षण विभागाने अल्पसंख्याक शाळेत नियमानुसार प्रवेश दिले जातात का, अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवल्या जातात का या अनुषंगाने पडताळणी सुरू केली. कारंजा येथील एका अल्पसंख्याक शाळेत नियमानुसार अल्पसंख्याक प्रवर्गातील ५० टक्के विद्यार्थी आढळून आले नसल्याची माहिती आहे. नियमानुसार कारवाईचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. वाशिम शहरातील जिल्ह्यातील अल्पसंख्याक शाळेतील प्रवेश प्रक्रियेची पडताळणी सुरू झाल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.


अल्पसंख्याक शाळेत नियमानुसार अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. प्रवेश प्रक्रियेची पडताळणी सुरू केली आहे. कारंजा येथील एका शाळेत नियमानुसार ५० टक्के विद्यार्थी हे अल्पसंख्याक प्रवर्गातील आढळून आले नाहीत. यासंदर्भात वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केला जाईल.
- अंबादास मानकर
प्राथमिक शिक्षणाधिकारी,
जिल्हा परिषद वाशिम.

Web Title: Verification of admission process in minority schools!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.