‘गोल्डन कार्ड’साठी ६७ हजार लाभार्थींची पडताळणी प्रक्रिया पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 06:40 PM2019-08-27T18:40:39+5:302019-08-27T18:40:47+5:30
२७ आॅगस्टपर्यंत ६७ हजार ६८३ लाभार्थ्यांच्या प्रस्तावांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून १४ हजारांवर प्रस्ताव निकाली काढणे अद्याप प्रलंबित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून सन २०११ च्या सर्वेक्षणानुसार आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास समुदायातून निवड झालेल्या जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ५५३ कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळणार आहे. त्यानुषंगाने संबंधित लाभार्थींना ‘गोल्डन कार्ड’ देण्यात येत असून या प्रक्रियेअंतर्गत २७ आॅगस्टपर्यंत ६७ हजार ६८३ लाभार्थ्यांच्या प्रस्तावांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून १४ हजारांवर प्रस्ताव निकाली काढणे अद्याप प्रलंबित आहे.
राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये आयुष्यमान भारत योजनेच्या गोल्डन कार्डधारकांनाही आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अंगीकृत असलेल्या वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासह अन्य खासगी रुग्णालयांमधील आरोग्य मित्रांना भेटून रितसर नोंदणी केली आहे. आपले सरकार सेवा केंद्रातून कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी प्रती व्यक्ती ठराविक नाममात्र शुल्क आकारले जात असून अंगीकृत रुग्णालयांमध्ये मात्र ही प्रक्रिया मोफत स्वरूपात राबविण्यात येत आहे.
दरम्यान, ‘गोल्डन कार्ड’ मिळविण्यापूर्वी संबंधित लाभार्थ्यांची ‘सिल्व्हर कार्ड व्हेरीफिकेशन’ प्रक्रिया राबविण्यात येत असून ८४ हजार १८४ लाभार्थ्यांची ‘सिल्व्हर कार्ड’ पडताळणी; तर ६७ हजार ६८३ लाभार्थ्यांची ‘गोल्डन कार्ड’ पडताळणी पूर्ण झाली आहे.
.............
कोट :
आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र जिल्ह्यातील लाभार्थ्यांची यादी आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायतीमध्ये नियुक्त डाटा एन्ट्री आॅपरेटर व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. त्यात नाव असलेल्या बहुतांश लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड तयार करून घेण्यासाठी नोंदणी केलेली आहे. याऊपरही काही लाभार्थी यापासून वंचित असतील तर त्यांनी शिधापत्रिका, प्रधानमंत्री यांचे स्वाक्षरीचे वितरीत करण्यात आलेले पत्र आणि आधारकार्ड सोबत आणून नोंदणी करून घ्यावी.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम