न उगवलेल्या बियाण्यांच्या पडताळणीचे अहवाल प्रलंबितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 11:29 AM2020-07-03T11:29:24+5:302020-07-03T11:29:44+5:30
तालुकास्तरीय समित्यांचा पाहणीसंदर्भातील अंतीम अहवाल अद्यापही तयार झालेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: कृषी विभागाच्या सुचनेनुसार यंदाच्या हंगामात न उगवलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना तातडीने बदलून द्यावे लागणार आहे. तथापि, आठवडा उलटून गेला तरी, तालुकास्तरीय समित्यांचा पाहणीसंदर्भातील अंतीम अहवाल अद्यापही तयार झालेला नाही. शिवाय, त्यातच अद्यापही न उगवलेल्या बियाण्यांच्या तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कृषी विभागाचा गोंधळ उडत आहे.
यंदाच्या हंगामात बियाणे न उगवल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना तातडीने बियाणे बदलून देण्यासाठी तालुकास्तरावर समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समित्या शेतकºयांच्या तक्रारीनुसार पाहणी करीत आहेत. आता या संदर्भात विशेष नमुन्यात अहवाल तयार करून तो शासनाकडे सादर करावा लागणार आहे; परंतु कृषी विभागाची पाहणीच पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे अहवाल प्रलंबित आहे.
शेतकºयांसह कंपनीलाही अहवाल
जिल्ह्यात न उगवलेल्या बियाण्यांच्या तक्रारीनुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी तालुकास्तरावर समित्यांची नियुक्ती केली आहे. या समितीत तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांसह कृषी विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांचाही समावेश आहे. या समित्या न उगवलेल्या बियाण्यांची पाहणी करून शेतकºयाचे नाव, गट क्रमांक, पेरलेल्या बियाण्यांची मात्रा, किती क्षेत्रावर बियाणे उगवले नाही. बियाणे न उगवण्याच कारण आदि बाबींचा समावेश असलेला अहवाल तयार करीत आहेत. हा अहवाल संबंधित शेतकरी आणि बियाणे उत्पादक कंपनीलाही सादर करावा लागणार आहे. बियाणे सदोष असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंपनी आणि शेतकरी त्यांच्या पातळीवर निर्णय घेऊ शकणार आहेत. त्याशिवाय शासनस्तरावर सादर करण्यासाठीही एक सर्वकश अहवाल तालुकास्तर समितीला तयार करावा लागणार आहे.
न उगवलेल्या बियाण्यांची तपासणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समित्याच अहवाल तयार करीत आहेत. जिल्ह्यात वाढत असलेल्या तक्रारींमुळे ही प्र्रक्रिया पूर्ण होण्यात अडथळे येत आहेत. शिवाय अहवालाची प्रक्रिया अत्यंत बारकाईने पूर्ण करावी लागणार आहे.
- एस. एम. तोटावार,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,
वाशिम