कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी पशुपालकांची परवड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 04:05 PM2019-07-24T16:05:19+5:302019-07-24T16:07:12+5:30
मालेगाव (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील मालेगाव, शिरपूर आणि जऊळका रेल्वे पशुवैद्यकीय केंद्रांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाºयाचे पद रिक्त आहे.
तीन केंद्रांमधील प्रकार : दोन वर्षांपासून पदे रिक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील मालेगाव, शिरपूर आणि जऊळका रेल्वे पशुवैद्यकीय केंद्रांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाºयाचे पद रिक्त आहे. दुसरीकडे प्रभारी अधिकाऱ्यांकडून कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने गुरांवर वेळेवर उपचार मिळणे अशक्य होत आहे. यामुळे शेकडो पशुपालकांची परवड होत आहे.
मालेगाव तालुक्यात शासनाच्या प्रत्येक विभागात अधिकारी, कर्मचाºयांची अनेक पदे रिक्त असून याकडे प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष होत आहे. मालेगाव पशुवैद्यकीय केंद्रात २०१५-१६ पासून कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने जवळपास सात हजार गुरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. असाच प्रकार शिरपूर पशुवैद्यकीय केंद्रातही उद्भवला असून आॅक्टोबर २०१७ पासून या केंद्राचा कारभार प्रभारीच्या खांद्यावर आहे. शिरपूर पशुवैद्यकीय केंद्राची धुरा रिठद येथील पशुवैद्यकीय अधिकारी स्नेहा गोरे सांभाळत असून त्या आठवड्यातून केवळ तीन दिवस येथे येतात. जऊळका रेल्वे येथेही मार्च २०१९ पासून पशुवैद्यकीय अधिकाºयाचे पद रिक्त आहे. त्याठिकाणचा कारभारही प्रभारी अधिकारी पाहतात. याशिवाय कर्मचाºयांचीही अनेक पदे रिक्त असल्याने दैनंदिन कामकाज प्रभावित होण्यासह आजारी गुरांवर वेळेवर उपचार होणे अशक्य ठरत आहे.