पशूवैद्यकीय केंद्र २८ महिन्यांपासून पशूधन विकास अधिकाऱ्यांविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 02:18 PM2020-03-02T14:18:18+5:302020-03-02T14:18:24+5:30
प्रभारी अधिकारी आठवड्यातून केवळ एक दिवस धावती भेट देतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : येथील पशूवैद्यकीय केंद्रांतर्गत समाविष्ट १३ गावांमध्ये सुमारे १४ हजार पशूधन आहे. असे असताना पशूवैद्यकीय केंद्रातील पशूधन विकास अधिकारी हे महत्वाचे पद २८ महिन्यांपासून रिक्त असून प्रभारी अधिकारी आठवड्यातून केवळ एक दिवस धावती भेट देतात. यामुळे गुरांच्या आरोग्याची निगा राखणे कठीण झाले आहे.
शिरपूर पशूवैद्यकीय केंद्रात आॅक्टोबर २०१८ पर्यंत पशूधन विकास अधिकारी म्हणून डॉ. स्वप्निल महाळंकर कार्यरत होते. त्यांची अचानक बदली झाल्यानंतर तेव्हापासून आजतागायत कायमस्वरूपी पशूधन विकास अधिकारी मिळाला नाही. मध्यंतरी डॉ. किरण शिरसाट, रिठदचे पशूधन विकास अधिकारी कापगते, स्वप्ना गोरे यांनी आठवड्यातून प्रत्येकी दोन दिवस कारभार सांभाळला; मात्र गत काही दिवसांपासून केवळ डॉ. किरण शिरसाट हेच आठवड्यातून एक दिवस हजेरी लावत आहेत.
गत दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी होऊनही शिरपूरला कायमस्वरूपी पशूधन विकास अधिकारी मिळालेला नाही. प्रभारी अधिकारी देखील आठवड्यातून एकच दिवस येत असल्याने नाईलाजास्तव खासगी डॉक्टरांकडून गुरांवर उपचार करावे लागत आहेत.
- मनोहरआप्पा बुकसेटवर
गो-पालक शिरपूर जैन
२ मार्च रोजी मी माझा आजारी बैल उपचारासाठी शिरपूरच्या पशूवैद्यकीय केंद्रात आणला होता. यावेळी मात्र पशूधन विकास अधिकारी नसल्याने बैलावर उपचारासाठी खासगी व्यक्तीची मदत घ्यावी लागली.
- राजकुमार इंगळे
पशूपालक, शिरपूर जैन