पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा ‘वनवास’ संपता संपेना!
By admin | Published: June 16, 2014 12:18 AM2014-06-16T00:18:40+5:302014-06-16T00:41:34+5:30
येथील तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा समस्यांचा वनवास संपता संपेना,
रिसोड : येथील तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाचा समस्यांचा वनवास संपता संपेना, अशी परिस्थिती आहे. या दवाखान्याभोवती व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे कर्मचार्यांसह पशुपालक व परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
दवाखान्याच्या इमारतीला ४७ वष्रे झाली असल्यामुळे तिला अखेरची घरघर लागल्याचे चित्र आहे. येथील पशुचिकित्सालयाची निर्मिती १९६६ ला झाली आहे. पशुचिकिल्सालयाचे क्षेत्रफळ दोन एकर चार आर आहे. या परिसरात पशुवैद्यकीय विकास अधिकारी, कर्मचारी वर्गाचे निवासस्थाने आहेत. सुरुवातीच्या काळात हा परिसर स्वच्छ व इमारती चांगल्या होत्या. आजमितीस परिसरात सर्वत्र घाण, इमारतीची निवासस्थानाची पडझड झाल्याने कर्मचारी वर्ग राहत नाहीत. घाणीमुळे या ठिकाणी काम करणार्या कर्मचार्यांचे व परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चिकित्सालयाची संरक्षण भिंत पडल्यामुळे नागरिक या ठिकाणी शौचास बसतात यामुळे दररोज डुकरांचा मुक्तसंचार असतो. कर्मचार्यांच्या बसण्याच्या ठिकाणची छताची कौल फुटलेली आहेत. यामुळे पाऊस सुरु असतांना कर्मचार्यांना बसायला सुध्दा नीट जागा नाही. शहरातील या पशुचिकित्सालयाला शहरासह नजीकच्या घोंसरवाडी, निजामपुर, मांगवाडी, आगरवाडी, शेलूखडसे, पाचांबा, करडा, सवड, चिंचाबाभर, कंकरवाडी, मुंगसाजी नगर अशा अकरा गावातील कामांचा व्याप आहे व येथे तालुका पशुधन अधिकारी व एक परिचर असे दोघेच कर्मचारी काम पाहतात. पंचायत समितीचा एक कर्मचारी सहाय्यक म्हणून दिल्याची माहिती आहे. येथील चिकित्सालयात एक पशुधन पर्यवेक्षक, एक पट्टीबंधक व दोन परिचर व इतर पाच ते सहा कर्मचार्यांची आवश्यकता आहे. मुबलक मनुष्यबळ आणि भौतिक सुविधांचा अभाव असल्याचा फटका पशुपालकांना बसत आहे. येथील औषधांचा साठा वरिष्ठ स्तरावरुन पुरविल्या जातो. मुलबक प्रमाणात औषधीसाठा असणे आवश्यक आहे. येथे गुरांसाठी एक्सरे मशीन उपलब्ध आहे व जवळपास त्याची किंमत ३0 लक्ष रुपये एवढे आहे. परंतु इमारतीचे छत गळत असल्याने ती मशीन उपयोगात आणणे कठीण आहे. चिकित्सालया भोवतालची दुर्गंधी व घाण ही कर्मचार्यांसाठी त्रासदायक असून त्यांना काम करतांना तारेवरची कसरतच करावी लागते. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी या बाबीची दखल घेण्याची मागणी पंजाबराव अवचार यांनी केली आहे.