VIDEO : माकडांच्या उच्छादामुळे ग्रामस्थांच्या जिवाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 04:20 PM2018-04-19T16:20:08+5:302018-04-19T16:20:08+5:30
गेल्या दोन वर्षांपासून मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे माकडांचे कळप उच्छाद घालत आहेत. त्यामुळे घरे आणि गोठ्यांवरील टिनाचे छत कोसळण्याच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांचा जीवच धोक्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण असून, वनविभागाने तात्काळ माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संपूर्ण गावकरी करीत आहेत.
वाशिम - गेल्या दोन वर्षांपासून मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे माकडांचे कळप उच्छाद घालत आहेत. त्यामुळे घरे आणि गोठ्यांवरील टिनाचे छत कोसळण्याच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांचा जीवच धोक्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण असून, वनविभागाने तात्काळ माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संपूर्ण गावकरी करीत आहेत.
पार्डी ताड येथे माकडांचे अनेक कळप गेल्या दोन वर्षांपासून गावातच फिरत आहेत. शेकडो माकडे गावात अन्नपाण्यासाठी सैरभैर फिरत असून, या घरावरून त्या घरावर सतत उड्या मारत आहेत. त्यामुळे गुरांचे गोठे आणि घरांवरील टिनाचे छत कोसळण्याच्या घटना घडत आहेत. एका घटनेत, तर माकडांच्या उच्छादामुळे गोठ्यावरील छत कोसळून म्हशीला गंभीर दुखापतही झाली. सुदैवाने छतावरील दगड गुरांच्या अंगावर न पडल्याने त्यांचा जीव वाचला. यापूर्वीही माकडांमुळे घराचे छत पडल्याने ग्रामस्थांना दुखापती झाल्या आहेत. पार्डी ताड येथे माकडाचे ८ ते १० कळप फिरत असून, माकडांच्या या कळपामुळे ओलिताची शेती करणा-या शेतक-यांत भीतीचे वातावरण आहे. मागील वर्षी विलास खंडे यांच्यावर माकडाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. अशोक डाळ यांच्या हाताला चावा घेतल्याने त्यांना शस्त्रक्रियाच करावी लागली होती. त्याशिवाय ज्ञानदेव सुर्वे, माणिक लांडगे यांनाही माकडांनी चावे घेतले होते. माकडांच्या भितीमुळे महिलावर्गातही भीतीचे वातावरण असून, महिला घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. घराबाहेर सुकण्यासाठी ठेवलेल्या कुरवड्या, मुंगवड्या आदिंसह धान्याचा फडशा ही माकडे पाडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ वैतागून गेले आहेत.
धोका टाळण्यासाठी वृक्षांची कटाई
पार्डी ताड येथे माकडांचा धुमाकूळ वाढला आहे. गावातील झाडांवर ही माकडे बसतात आणि काही वेळाने घराच्या छतावर येतात, आवारात उड्या मारून घरातही घुसतात. त्यामुळे महिला, बालकांच्या जिवाला धोका झाला असून, माकडांच्या संचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी गावातील लोक घरासमोर असलेले वृक्षच तोडत आहेत. आजवर १५ ते २० वृक्ष माकडांच्या भीतीमुळे तोडण्यात आले आहेत. यामुळे गावातील हिरवळही नष्ट होत असून, गाव भकास होत असल्याचे दिसत आहे. वनविभागाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन माकडांना पिटाळून लावले नाही, तर पार्डी ताड गावात येत्या काही दिवसांत वृक्षच दिसणार नाही, अशी भितीही निर्माण झाली आहे.