VIDEO- धगधगत्या उन्हात वन्यप्राण्यांचीही त्रेधा; चारा, पाण्यासह निवाऱ्यासाठीही धावाधाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 02:42 PM2018-04-03T14:42:46+5:302018-04-03T14:48:27+5:30
गेल्या काही वर्षांपासून वारेमाप वृक्षतोडीमुळे जंगलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे.
वाशिम- गेल्या काही वर्षांपासून वारेमाप वृक्षतोडीमुळे जंगलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्याचा फटका मानवाप्रमाणेच वन्यप्राण्यांनाही बसत असून, धगधगत्या उन्हात चारा, पाण्यासह विश्रांतीसाठी सावलीचा शोध घेण्यासाठी वन्यप्राणी भटकंती करीत असल्याचे चित्र वाशिम जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
वाशिम जिल्ह्यात पूर्वीच्या काळात जंगलाचे प्रमाण मोठे होते; परंतु कालांतराने वाढत्या लोकसंख्येनुसार वाढत चाललेली लोकवस्ती आणि वारेमाप वृक्षतोडीमुळे जंगलाचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांनाही विश्रांतीसाठी योग्य असे वृक्ष मिळेनासे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात उन्हाचा पारा ४२ सेल्सिअस डिग्रीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे जिवाची काहिली होत असून, माणसाने स्वत:च्या सुरक्षेसाठी निवारे बांधताना वन्यजिवांचा मात्र मुळीच विचार केला नाही. आपल्या स्वार्थासाठी केलेल्या जंगलतोडीचे दुष्परिणाम मानवाला सोसावे लागतच आहेत. झाडांची संख्या घटल्याने जंगलक्षेत्र कमी होऊन जमिनीची धूप वाढली, पावसाचे प्रमाण कमी झाले. त्याचा फटका मानवापेक्षा अधिक वन्यप्राण्यांना बसत आहे. जंगलात कळपाने फिरणारी काळविटे, हरणे, निलगायी यांना विश्रांतीसाठी भरपूर अशी सावलीच कुठे दिसत नाही. आधीच भुक आणि तहानेमुळे या प्राण्यांचा जीव व्याकूळ होत असताना उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडे शोधत आहेत. त्यातच मानवाचा जंगलातील संचार वाढल्यामुळे भयग्रस्त झालेले हे वन्यप्राणी सैरभैर पळत असल्याचे चित्र दिसत आहे.