vidhan sabha 2019 : वंचित बहुजन आघाडीकडून जाधव, चव्हाण यांना उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 12:34 PM2019-10-01T12:34:25+5:302019-10-01T12:35:07+5:30
रिसोड विधानसभा मतदारसंघात दिलीप जाधव तर कारंजा विधानसभा मतदारसंघात डॉ. राम चव्हाण यांची उमेदवारी जाहिर केली
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चवथ्या दिवशी वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघात दिलीप जाधव तर कारंजा विधानसभा मतदारसंघात डॉ. राम चव्हाण यांची उमेदवारी जाहिर केली. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची प्रतिक्षा कायम आहे.
जिल्ह्यातील रिसोड, वाशिम व कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघासाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख जवळ येत असल्याने राजकीय घडामोडीनेही वेग घेतला आहे. रविवारी, काँग्रेसने रिसोड विधानसभा मतदारसंघातून आमदार अमित झनक यांना तर शिवसेनेने विश्वनाथ सानप यांना पुन्हा उमेदवारी बहाल केली. सोमवारी सायंकाळी शिवसेना, भाजपा आणि रिपाइं महायुतीची घोषणा भाजपा आणि शिवसेनेच्या संयुक्त पत्रकाद्वारे करण्यात आली. युतीची घोषणा झाली असली तरी जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
शिवसेनेने रिसोड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहिर केल्याने, उर्वरीत कारंजा व वाशिम विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे राहतील, असा अंदाज राजकीय गोटातून बांधला जात आहे.
कारंजा भाजपाकडे गेला तर शिवसेनेचे माजी आमदार प्रकाश डहाके नेमकी कोणती भूमिका घेतात, यावर तेथील चित्र अवलंबून राहणार आहे. रिसोड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिल्यास, गत दहा वर्षांपासून राजकीय विजनवासात असलेले भाजपाचे माजी आमदार विजयराव जाधव कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. दरम्यान, कारंजा व रिसोड विधानसभा मतदारसंघात बंडाळी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वंचितच्या वाशिम मतदारसंघातील उमेदवारीकडे लक्ष
वंचित बहुजन आघाडीने सोमवारी १८० उमेदवारांची यादी जाहिर केली. यामध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव तर कारंजा विधानसभा मतदारसंघात डॉ. राम चव्हाण यांच्या उमेदवारीचा समावेश आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघातून नेमकी कुणाला उमेदवारी जाहिर होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. येथे दोन ते तीन जण इच्छूक असून, ऐनवेळी कोणती खेळी खेळली जाते, याकडे वंचितच्या इच्छूकांसह राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
४दरम्यान कारंजा विधानसभा मतदारसंघातून भारिप-बमसंचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांची उमेदवारी जाहीर होईल अशी शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात होती. परंतू, कारंजामधून डॉ. चव्हाण यांचे नाव जाहिर झाले. दरम्यान, पुंजानी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
रिसोड मतदारसंघात जि.प.चे दोन माजी सभापती आमने-सामने
४रिसोड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वनाथ सानप तर वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी सभापती दिलीप जाधव एकमेकांविरूद्ध उभे ठाकले आहेत.
४जिल्हा परिषदेत एकमेकांना साथ देणारे जाधव व सानप यांनी विधानसभेत एकमेकांविरोधात दंड थोपटल्याने ही लढत नेमकी कशी रंगणार, याची उत्सुकता मतदारांना लागून आहे.