vidhan sabha 2019 : सेनेच्या मनसुब्यावर पाणी फेरले जाण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 02:43 PM2019-09-22T14:43:47+5:302019-09-22T14:43:56+5:30
काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर भाजपा-शिवसेनेसोबतच वंचित बहुजन आघाडीचेही कडवे आव्हान उभे ठाकणार असल्याचे काहीसे चित्र सद्या दिसून येत आहे.
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : भाजपाकडून आमदार म्हणून नेतृत्व करित असलेल्या जिल्ह्यातील वाशिम, कारंजा या मतदारसंघांसोबतच रिसोड मतदारसंघावरही भाजपाने दावा ठोकला आहे. दुसरीकडे शिवसेनाही तीन्ही मतदारसंघांमध्ये लढण्यास इच्छुक आहे. अशात युती झाल्यास प्रामुख्याने शिवसेनेच्याच मनसुब्यांवर पाणी फेरले जाणार असल्याचे बोलले जात आहे. तुलनेने जिल्ह्यात वलय कमी झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर भाजपा-शिवसेनेसोबतच वंचित बहुजन आघाडीचेही कडवे आव्हान उभे ठाकणार असल्याचे काहीसे चित्र सद्या दिसून येत आहे.
वाशिम मतदारसंघात तिसऱ्यांदा आमदार म्हणून प्रतिनिधीत्व करित असलेले लखन मलिक भाजपाकडून यंदा पुन्हा उमेदवारीची ‘डिमांड’ करित आहेत; मात्र युती न झाल्यास मलिकांना २०१४ च्या निवडणुकीप्रमाणेच यावेळी देखील शिवसेनेच्या उमेदवाराला पाडण्यासाठी निकराची झुंज द्यावी लागणार असल्याचे संकेत राजकीय वर्तुळातून मिळत आहेत.
कारंजा लाड विधानसभा मतदारसंघात गतवेळच्या निवडणुकीत शिवसेनेतून भाजपात पक्षप्रवेश करून निवडणूक लढलेल्या राजेंद्र पाटणी यांचा २०१४ च्या निवडणूकीत केवळ ४१४७ मतांनी विजय झाला होता. यंदा शिवसेनेत महत्वाचे स्थान मिळवून असलेले राष्ट्रवादीचे तत्कालिन आमदार प्रकाश डहाके यांना सेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आणि युती तुटल्यास पाटणींचा विजय सोपा नसणार, अशी चर्चा होत आहे.
रिसोड मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीतही काँग्रेसकडून अमीत झनक यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. दुसरीकडे भाजपाकडून उमेदवारी मिळविण्याकरिता अनेकजण इच्छुक असून शिवसेनेने या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. वंचित बहुजन आघाडीकडूनही या मतदारसंघात तगडा उमेदवार उभ्या करण्याच्या हालचाली गतीमान झाल्याने रिसोड विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत.
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्यासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात प्रामुख्याने शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री अनंतराव देशमुख, राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुभाष ठाकरे, माजी आमदार प्रकाश डहाके, विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी, अमीत झनक, लखन मलिक आदिंचा समावेश आहे.
काँग्रेस-रा.काँ. च्या भुमिकेकडे सर्वांचेच लक्ष
आगामी विधानसभा निवडणुकीत युती तुटणार की भाजपा-सेना सोबत लढणार, यावर चर्चा सुरू असतानाच काँग्रेस-रा.काँ.ची भूमिका नेमकी काय राहणार, कोणते उमेदवार दिले जाणार, याकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे.
९.५३ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वाशिम जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांमध्ये महिला व पुरूष असे एकंदरित ९ लाख ५३ हजार ७४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी ३३-रिसोड मतदारसंघात ३३१ मतदान केंद्र राहणार असून वाशिम मतदारसंघात ३६९ आणि कारंजा लाड मतदारसंघात ३५२ असे एकूण १०५२ मतदान केंद्र असणार आहेत.