विद्यूत उपकेंद्रांची कामे अडकली ‘लालफितशाहीत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 02:56 PM2018-09-29T14:56:18+5:302018-09-29T14:57:04+5:30
वाशिम : जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून ११ बॅरेजेस उभारण्यात आले. त्यापैकी ९ बॅरेजेससह अन्य ३ अशा १२ ठिकाणी विद्युत उपकेंद्र उभारले जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून ११ बॅरेजेस उभारण्यात आले. त्यापैकी ९ बॅरेजेससह अन्य ३ अशा १२ ठिकाणी विद्युत उपकेंद्र उभारले जाणार आहेत. त्यासाठी लागणाºया ९२ कोटी रुपये निधीपैकी २५ कोटी रुपयांचा निधी जलसंपदा विभागाकडून महावितरणकडे ५ एप्रिल २०१८ रोजी सुपूर्द करण्यात आला. त्यास येत्या ५ आॅक्टोबरला ६ महिने पूर्ण होतात. असे असताना कामे अद्याप सुरू झाली नसून यासंदर्भातील निविदा प्रक्रियाच अद्याप पूर्ण झाली नसल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.
वाशिम जिल्ह्यातील अधिकांश शेती कोरडवाहू असून जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांची उपजिविका पारंपरिक पिकांवरच विसंबून आहे. सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात असल्याने फळपिके, भाजीपाला यासह बागायती क्षेत्राचे प्रमाण तुलनेने अल्प आहे. हे चित्र पालटण्यासाठी जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगेचे पाणी अडविण्यासाठी शासनाने आडगाव, कोकलगाव, गणेशपूर, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली, राजगाव, वरूड, जुमडा, जयपूर आणि उकळी अशा ११ ठिकाणी बॅरेजेस उभारले. यामुळे वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५५४ आणि नजिकच्या हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मात्र, कृषिपंपांसाठी लागणारी वीज जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत ही बाब शक्य होणार नसल्याचे शासनाने ९२ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजूरी देवून पहिल्या टप्प्याचा २५ कोटी रुपये निधी महावितरणला दिला. त्यातून आतापर्यंत कामे सुरू होणे क्रमप्राप्त होते. मात्र, अद्याप निविदा प्रक्रियाच पूर्ण झाली नसल्याने ही कामे प्रत्यक्षात कधी सुरू होतील, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बॅरेजेस परिसरात वीज सुविधा उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. १० आॅक्टोबरपर्यंत ‘टेंडर’ खुलतील, त्यानंतर कंत्राटदार निश्चित करून प्रत्यक्ष कामे सुरू होतील.
- आर.जी. तायडे
कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम