प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 03:05 PM2018-08-23T15:05:56+5:302018-08-23T15:06:10+5:30
जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे लघू आणि मध्यम असे सर्व प्रकल्प ओव्हर फ्लो
वाशिम: जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे लघू आणि मध्यम असे सर्व प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून, सांडवा असलेल्या प्रकल्पातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. अशात पावसाचे पाणी आणि सांडव्याच्या पाण्यामुळे प्रकल्प परिसरातील नदी नाल्यांना मोठा पूर येण्याची भीती आहे.
या पृष्ठभूमीवर पाटबंधारे विभागाच्या वतीने संबंधित ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जलाशय पूर्ण भरले असून, बहुतांश प्रकल्पातून पाण्याच्या सांडव्याद्वारे २० सेंमीपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सद्यस्थितीत पाऊस जोरदार पडत असल्याने प्रकल्पांच्या कालव्याचे पाणी सांडव्याद्वारे नदी नाल्यातून वाहत असताना नदी, नाल्याच्या पुराची पातळी कधीही वाढून संबंधित गावांत पाणी शिरून नुकसान होण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतींनी सतर्कता बाळगावी, असा सूचनावजा इशारा पाटबंधारे विभागाच्यावतीने विविध ग्रामपंचायतींना पत्राद्वारे देण्यात आली आहे. सदर पत्रानुसार ग्रामस्थांनी दक्षता बाळगावी म्हणून या पत्राची प्रत ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.