गाव कृती आराखडा पंधरवाडा अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 05:20 PM2021-07-25T17:20:11+5:302021-07-25T17:20:28+5:30
Washim News : २२ जुलै ते ७ आॅगस्ट या कालावधीत गाव कृती आराखडा पंधरवाडा अभियान हाती घेण्यात आले आहे.
वाशिम : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत नळ जोडणी द्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन राबविले जात असून, याअंतर्गत २२ जुलै ते ७ आॅगस्ट या कालावधीत गाव कृती आराखडा पंधरवाडा अभियान हाती घेण्यात आले आहे.
ग्रामीण भागात प्रत्येक पात्र कुटुंबाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने जल जीवन मिशन राबविण्यात येत आहे. या मिशनअंतर्गत ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती करणे आणि गाव कृती आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे २२ जुलै ते ७ आॅगस्ट या दरम्यान विशेष अभियान राबविण्यात येत आहे. तालुका पातळीवर २८ ते ३१ जुलै आणि गावपातळीवर १ ते ३ आॅगस्ट या कालावधीत आॅनलाईन पद्धतीने गाव कृती आराखड्याबाबत सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप आॅपरेटर, आशा वर्कर, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची दोन प्रतिनिधी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कृती आराखड्याची माहिती संकलित करण्यात येणार आहे. ५ ते ७ आॅगस्ट दरम्यान प्राप्त माहितीवरून कृती आराखड्याची निर्मिती व गाव कृती आराखडा पडताळणी प्रक्रिया करून येत्या १५ आॅगस्ट रोजी होणाºया ग्रामसभेमध्ये मंजुरीकरिता कार्यक्रम पत्रिकेवर हा आराखडा ठेवण्यात येणार आहे.
सर्वांनाच मिळणार प्रशिक्षण
२२ जुलै रोजी जल जीवन मिशन राज्य पाणी व स्वच्छता विभागाच्यावतीने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एन्ट्री आॅपरेटर व जिल्हा कक्षाच्या सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार, यांना आॅनलाईन पद्धतीने गाव कृती आराखडा याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये गाव कृती आराखड्यातील माहिती संकलन, कोबो टूलव्दारे माहिती अपलोड करणे बाबत प्रशिक्षण देण्यात आले. दुसºया टप्प्यात २३ ते २७ जुलै या कालावधीत पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता, भूवैज्ञानिक, मनुष्यबळ विकास सल्लागार, सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार, पाणी गुणवत्ता सल्लागार व तालुका स्तरावरील गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, उप अभियंता, शाखा अभियंता, गटसमन्वयक, समुह समन्वयक यांना आॅनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबापर्यंत नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. या अंतर्गत २२ जुलै ते ७ आॅगस्ट या कालावधीत गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. सर्व संबंधितांना आॅनलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिले जात आहे.
- वसुमना पंत
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, वाशिम