ध्यास ग्रामस्वच्छतेचा; माजी सरपंच गोळा करतात कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 05:08 PM2019-05-04T17:08:35+5:302019-05-04T17:09:05+5:30
अंचळ या गावातील विद्यमान सरपंचांचे पती तथा माजी सरपंच कुंडलिक जनार्दन जुनघरे व बळीराम वानखेडे हे दोन स्वछतादूत घंटागाडीने गावभर फिरून घरातला ओला व सुका कचरा गोळा करतात.
- अमोल कल्याणकर
मालेगाव (वाशिम): येथूनच जवळ असलेल्या अंचळ या गावातील विद्यमान सरपंचांचे पती तथा माजी सरपंच कुंडलिक जनार्दन जुनघरे व बळीराम वानखेडे हे दोन स्वछतादूत घंटागाडीने गावभर फिरून घरातला ओला व सुका कचरा गोळा करतात, तसेच कचºयाची स्वत:च विल्हेवाट लावतात. ग्रामस्वच्छतेचा त्यांचा हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरत आहे.
अंचळ येथील कुंडलिक जनार्दन जुनघरे हे विद्यमान सरपंच संगीता जुनघरे यांचे पती आहेत. मात्र, सरपंच पती असल्याचा कुठलाच आर्विभाव ते दाखवित नाहीत. लहान वयातच पित्याने आत्महत्याब केल्यानंतर पितृछत्र हरविलेल्या कुंडलिक जुनघरे यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. उदरभरणासाठी आधार नसल्याने त्यांनी सुरुवातीच्या काळात मिळेल ते काम केले. फावल्या वेळेत जनतेची कामेही त्यांनी मोफत केली. त्यामुळे ते गावातील सर्वाचे आवडते व्यक्ती झाले. अशात त्यांच्याकडे गावचे सरपंच पद आले. मागील दोन पंचवार्षिक कालावधित त्यांनी हे पद भुषविले. सद्यस्थितीत त्यांच्या पत्नीकडे सरपंच पद आहे. पत्नी सरपंच असतानाही त्यांच्यात कसलाही अहंभाव निर्माण झाला नाही. गावच्या स्वच्छतेसाठी ते स्वत: कचरा संकलन करतात यातूनच त्यांचे साधे व्यक्तीमत्त्व दिसून येते. गाव स्वच्छतेसाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. एक दिवसही न चुकता गावातील सर्व कचरा संकलित करतात गावातील स्वत: फिरूून ओला व सुका कचरा गोळ्या करुन गावाबाहेर त्याची विल्हेवाट लावतात त्याशिवाय गावात स्वत:च धूर फवारणी करून गावात स्वच्छतेचा जागर ते करीत आहेत. सात सदस्य असलेल्या त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये ३ कर्मचारी असतानाही अनेक वषार्पासून हे काम ते स्वत: करीत आहेत. त्यांच्या या कार्यात बळीराम वानखडे हेसुद्धा त्यांना तितक्याच नेटाने कोणताही मोबदला न घेता सहकार्य करत आहेत. स्वच्छतेबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांनी स्वत: जवळून पैसे खर्च करून वृक्षारोपण करतानाच ३०० वृक्षांना त्यांनी सुरक्षाकवच त्यांनी बसवले. या वृक्षांना ते स्वत: पाणी घालत आहेत.
गाव केले हागणदारीमुक्त
कुंडलिक जुनघरे यांनी अंचळ या गावात शंभर टक्के शौचालय बांधण्यासाठी गावकºयांना प्रोत्साहित केले आणि ते काम त्यांच्याकडून करून घेतले. त्यामुळे आज गाव हागणदारी मुक्त झाले आहे. आजच्या परिस्थितीतही ते स्वत: नित्यनेमाने स्वच्छता करतात त्यामुळेच गावातील उघड्यावरील शौचवारी बंद झाली आहे.