गावपातळीवर ग्रामस्तरीय समित्या सक्रिय करण्यात याव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:42 AM2021-04-27T04:42:44+5:302021-04-27T04:42:44+5:30
आतापर्यंत कोरोना विषाणू संसर्ग हा शहरी भागात पाहावयास मिळत होता. परंतु दुसऱ्या लाटेत कोरोनाने ग्रामीण भागातही हातपाय पसरवणे सुरु ...
आतापर्यंत कोरोना विषाणू संसर्ग हा शहरी भागात पाहावयास मिळत होता. परंतु दुसऱ्या लाटेत कोरोनाने ग्रामीण भागातही हातपाय पसरवणे सुरु केले आहे. मागील काही दिवसाचा
कोरोनाबाबतचा अहवाल तपासला तर मालेगाव तालुक्यात ग्रामीण भागात गावागावात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मालेगाव शहरापेक्षा कितीतरी अधिकपटीने खेड्यात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत . याचेच उदाहरण घ्यावयाचे झाल्यास शेलगांव बोंदाडे येथे जवळपास दोनशे, धमधमी या लहान गावात ७० ते ८० रुग्ण कोरोनाचे आढळले तर आतापर्यंत जवळपास सर्वच गावात कमी अधिक प्रमाणात कोरोना पोहोचला आहे तर अनेक नागरिक हे आजारी आहेत. अनेकांनी कोरोना तपासणी न करता शहरातील खासगी डॉक्टर्सकडून उपचार घेतले जात आहेत. अशा स्थितीत गावागावात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे ही बाब चिंतनीय आहे . त्यामुळे कोरोनावर प्रतिबंधात्मक उपायासाठी आता ग्रामीण भागातही लक्ष देणे आवश्यक झाले आहे . त्यासाठी सर्वप्रथम गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समित्या या पुन्हा सक्रिय करणे गरजेचे आहे. या समितीच्या माध्यमातून गावात घराघरात सर्व्हे करुन आजारी असणाऱ्या रुग्णांची माहिती घेऊन त्यावर उपचाराबाबत आरोग्य विभागाला कळविणे महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या या संकटात आरोग्य विभागावर कामाचा भार अधिक असल्याने गावागावात कॅम्प घेता येत नसले तरी गावातील आजारी व्यक्तींना शासकीय रुग्णालयात आणण्यासाठी कुटुंबातील सदस्य, ग्राम समिती सदस्य यांच्यावर जबाबदारी देता येईल. याबाबत विचार करुन प्रशासनाने योग्य कारवाई करावी व लॉकडाऊन नियम ग्रामीण भागातही कडक लागू करावेत अशी मागणी केली जात आहे.