ग्रामदक्षता समित्यांनी सतर्क राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:42 AM2021-05-08T04:42:56+5:302021-05-08T04:42:56+5:30
गतवर्षीच्या कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात या विषाणूबाबत लोकांमध्ये प्रचंड भीती होती. त्यावेळी ग्रामदक्षता समित्यांनी नागरिकांत विविध प्रकारे जनजागृतीचे काम केले ...
गतवर्षीच्या कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात या विषाणूबाबत लोकांमध्ये प्रचंड भीती होती. त्यावेळी ग्रामदक्षता समित्यांनी नागरिकांत विविध प्रकारे जनजागृतीचे काम केले होते; मात्र यंदा दुसऱ्या लाटेत गतवर्षी स्थापन केलेल्या काही दक्षता समित्या सुस्त असल्याचे दिसून येत असताना आता मात्र जिल्हा व तालुका प्रशासनाकडून त्यांना सतर्कतेच्या सूचना देण्याची गरज निर्माण झाली आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असून याबाबत अजूनही ग्रामीण भागात फारशी काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करणे, गावातील नियोजनाची जबाबदारी, आदींविषयी या समितीकडून पूर्वीसारखा पाठपुरावा होत नाही. यापूर्वी गावात रुग्ण आढळला, तर त्याच्या नियोजनाची जबाबदारी या समित्यांकडे होती; परंतु आता कोणी कोणाला आदेश द्यायचा, यावरून संभ्रम असल्याने काही गावांतील समिती सदस्य यांचा अपवाद वगळता बऱ्यापैकी समिती सदस्यांनी अंग काढून घेतल्याचे चित्र काही गावांमध्ये दिसत आहे. ग्रामदक्षता समित्यांनी आताही आणि यापुढेही सतर्क राहून कोरोना नियंत्रणासाठी आपले योगदान द्यावे, असा सूर गावकऱ्यांमधून उमटत आहे.