किनखेडा येथील दारू विक्री बंदसाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:42 AM2021-05-27T04:42:58+5:302021-05-27T04:42:58+5:30
वाशिम : तालुक्यातील किनखेडा येथे मागील तीन महिन्यांपासून अवैध दारू विक्रीने कळस गाठला असल्याने गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, शिवाय ...
वाशिम : तालुक्यातील किनखेडा येथे मागील तीन महिन्यांपासून अवैध दारू विक्रीने कळस गाठला असल्याने गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, शिवाय चोऱ्या, भानगडी, वादविवादाचे प्रमाण वाढल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ आक्रमक बनले आहेत. त्वरित दारू विक्री बंद करण्याची मागणी जउळका पाेलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कडक निर्बंध लावले असताना या गावात मोठ्या प्रमाणात दारूविक्री सुरू असल्यासंदर्भात ग्रामस्थांमध्ये विविध चर्चा रंगत आहेत. किनखेडा हे गाव अवघे एक हजार लोकसंख्या असलेले, तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शेती क्षेत्रात नावाजलेले आहे. आजघडीला अवैध दारू विक्रीने कोरोनाग्रस्तांचे तालुक्यातील रेड झोन बनले आहे, मागील दोन महिन्यांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावात शेकडो कोरोनाग्रस्त आढळले. गावात असे घर सुटले नाही, ज्या घरात रुग्ण नाही. यामधील बरेच रुग्ण दगावले, परिणामी गाव जिल्हा यंत्रणेच्या हॉट स्पॉट रडारवर आले. अशात गावात सर्रास अवैध दारूविक्री सुरू आहे. कोरोना वाढीस कारण व गावातील शांतता भंग करणारी दारूविक्री तात्काळ थांबवावी. यासाठी ग्रामस्थांनी, विविध ग्रामपातळीवरील समित्यांसह ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना संबंधितांना २४ मे राेजी निवेदन सादर केले आहे.
निवेदनावर सरपंच सुजाता सुनील लांडकर, उपसरपंच वर्षा संतोष लांडकर, पोलीसपाटील महादेव लांडकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश चोडकर, शाळा समितीचे अध्यक्ष महादेव शिंदे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
....................