पुरात वाहून जाताना गावकरी आले धावून; महिला बालंबाल बचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 01:54 PM2021-06-26T13:54:38+5:302021-06-26T13:55:21+5:30
Washim News : ही घटना रिसोड तालुक्यातील जयखेड-नेतन्स मार्गावरील पुलाजवळ घडली.
वाशिम : शुक्रवार, २५ जून रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे नाल्याला पूर आहे. पुराचा जोर कमी असल्याचे पाहून शेतातून परतणाºया शेतकरी, शेतमजूरांनी नाला ओलांडून घरी जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पुराचा जोर किंचितचा वाढल्याने एक महिला वाहून जाण्याच्या स्थितीत असताना, सहकारी गावकरी मदतीला धावले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही घटना रिसोड तालुक्यातील जायखेडा-नेतन्सा या रस्त्यावरील पुलाजवळ शुक्रवारी घडली.
पावसाळ्याच्या दिवसात नादुरूस्त पूल, रस्त्यांची दुरूस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाने बांधकाम विभागाला यापूर्वीच दिलेले आहेत. तथापि, अद्यापही अनेक ठिकाणी जमिन समांतर असलेल्या नदी, नाल्यावर पूलाची निर्मिती नाही. रिसोड तालुक्यातील जायखेडा-नेतन्सा या रस्त्यावरील नाल्यावर पुल नाही. पुलाची निर्मिती करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. मात्र, अद्याप याकडे कुणीही लक्ष दिले नसल्याचे गावकरी सांगतात. पावसाळ्याच्या दिवसात नाल्याला पूर आला तर शेतकरी, शेतमजूर व प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. पूर ओसरल्यानंतर किंवा पूराचा जोर वाढविण्यापूर्वी काही जण जीव मुठीत घेऊन नाला ओलांडण्याचा प्रयत्न करतात. २५ जून रोजी सायंकाळच्या सुमारास जायखेडा, नेतन्सा परिसरात दमदार पाऊस झाला. पुराचा जोर वाढविण्यापूर्वी शेतकरी, शेतमजूर हे एकमेकांच्या साहाय्याने नाला ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना, पाण्याचा जोर वाढल्याने एका महिलेचा हात सुटला. यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली. मदतीसाठी याचना करणाºया महिलेच्या मदतीला तातडीने सहकारी धावले आणि पुढील अनर्थ टळला.
आता तरी पुलाची निर्मिती करावी !
जायखेडा-नेतन्सा या नाल्यावर पूल नसल्याने दोन्ही गावातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या नाल्याची पुलाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायणराव आरू, जायखेडा-जोगेश्वरी गट गामपंचायत सरपंच मंदाकिनी साहेबराव वाळूकर, मदन इंगोले, किसन इंगोले, पोलीस पाटील बंडू पाटील वाळूकर, दौलतराव वाळूकर, अशोकराव वाळूकर, दत्ता वाळूकर, भगवान पाटील वाळूकर, राजेश बाजड, विनोद बाजड, ज्ञानबा बाजड आदींनी केली.