तेंदूपत्त्याने दिला मजुरांना रोजगार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 05:05 PM2019-05-04T17:05:08+5:302019-05-04T17:05:52+5:30
तेंदूपत्ता तोडणीतून मंगरुळपीर तालुक्यातील पिंप्री अवगण येथे अनेक कुटुंबाला आधार मिळाला आहे.
- साहेबराव राठोड
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार (वाशिम): वाशिम जिल्ह्यातील बहुतांश भागांत दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्याने शेतमजुरांच्या हाताला कामे मिळेनासी झाली आहेत. अशात वनपरिक्षेत्रातील तेंदूपत्ता तोडणीमुळे शेकडो मजुरांच्या हाताला काम मिळत असल्याचे चित्र दिसत असून, तेंदूपत्ता तोडणीतून मंगरुळपीर तालुक्यातील पिंप्री अवगण येथे अनेक कुटुंबाला आधार मिळाला आहे.
वाशिम जिल्ह्यातील बहुतांश शेती ही कोरडवाहू अर्थात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली आहे. त्यामुळे खरीप हंगामानंतर जिल्ह्यातील शेतमजुरांना कामे मिळत नाहीत. परिणामी दरवर्षी खरीप हंगामानंतर हजारो मजूर रोजगारासाठी मुंबई, पुणे या मोठ्या शहरांसह गुजरात, आंध्रप्रदेश सारख्या राज्यात स्थलांतर करतात. यंदाही जिल्ह्यातील हजारो शेतमजुरांनी रोजगारासाठी परराज्यात स्थलांतर केले आहे. त्यातच यंदा जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत असतानाच शेतमजुरांच्या कुटूंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. अशा स्थितीत वनविभागाकडून तेंदूपत्त्याचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदारांचा अनेक कुटूंबाना आधार मिळाला आहे. सर्वसाधारण १०० पानांसाठी १८८ रुपये त्यांना मोबदला मिळत आहे. जंगलात फिरुन तेंदू झाडांची पाने तोडायची एका ठिकाणी ही पाने प्रत्येकी पन्नास प्रमाणे एकास एक जोडायची आणि दोन्ही मिळून उलटी सरकी जोडणी करून एक पुडा तयार करायचा, असा या कामाचा प्रकार आहे. कामगार जेवढी पाने तोडतील. तेवढा मोबदला त्यांना मिळतो. त्याशिवाय शासनाकडून या कामांना बोनसही दिला जातो. त्यामुळे या व्यवसायातून जिल्ह्यातील शेकडो कु टुंबाचे उदरभरण होत असल्याचे दिसत आहे. यात मंगरुळपीर तालुक्यातील पिंप्री अवगण येथील ३० ते ३५ परिवारांतील कामगारांचाही समावेश असून, सकाळी ३ ते ४ वाजता हे कामगार जंगलात जाऊन तेंदूपत्ता तोडून आणतात आणि त्यानंतर सकाळी १० वाजतापासून घरी संपूर्ण परिवार पानांचे पुडे तयार करीत बसतात.