जलस्त्रोतांच्या पुनरुज्जीवनासाठी ग्रामस्थांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 02:51 PM2019-06-29T14:51:00+5:302019-06-29T14:51:06+5:30
कारंजा तालुक्यात बहुतांश गावात हे चित्र पाहायला मिळत असून, विविध प्रशासकीय विभागाकडून सुरू असलेल्या कामांना ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
- प्रफुल बाणगावकर
कारंजा लाड (वाशिम) : पाणीटंचाईच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना आता जलसंधारणाचे महत्त्व कळू लागले आहे. त्यामुळेच अस्तित्वात असलेल्या जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी त्यांची मोठी धडपड सुरू आहे. कारंजा तालुक्यात बहुतांश गावात हे चित्र पाहायला मिळत असून, विविध प्रशासकीय विभागाकडून सुरू असलेल्या कामांना ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
कारंजा तालुक्यातील अनेक गावांत दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू होते. त्यामुळे रोजगारांवर परिणाम होतोच शिवाय इतर कामांतही अडचणी निर्माण होतात. पाण्याअभावी गुरांचे पोषण करणे कठीण जाते. वणवण करूनही घशाची कोरड मिटविण्याइतपत पाणी मिळत नसल्याचे वास्तवही काही गावांत आहे. अशाच गावातील पाणीटंचाई मिटविण्यासाठी राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून कृषी विभाग, जि.प. लघू सिंचन विभाग, पाटबंधारे विभाग आणि जलसंपदा विभागाच्यावतीने नाला खोलीकरण, शेततळे, ढाळीचे बांध, सिमेंट नाला बांध, नदी खोलीकरण, तलाव खोलीकरणाची कामे करण्यात येत आहेत. यामुळे गावातील पाण्याची समस्या मिटण्यास मोठी मदत होणार असल्याने गावकरी या कामांसाठी प्रशासकीय विभागांना सहकार्य करत असल्याचे चित्र कारंजा तालुक्यात दिसूत असून, यामुळेच कारंजा तालुक्यात मोखड पिंप्री, हिंगणवाडीसह विविध गावांत जलस्त्रोतांच्या पुनरुज्जीवनाची कामे वेगात करण्यात येत असून, त्याचा फायदाही ग्रामस्थांसह शेतकºयांना होत आहे.
जलसंधारण विभागाची धडपड
पावसाळा सुरू झाला असून, ठिकठिकाणी जोरदार पाऊसही पडत आहे. यामुळे जलस्त्रोतांच्या खोलीकरणात अडथळे निर्माण होत आहेत. पुढे पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर ही कामे करणे अशक्य होणार आहे. त्यामुळे जलसंधारण विभाग त्यांच्या अखत्यारीत असलेली कामे पूर्ण करण्यासाठी मोठी धडपड करीत आहे. हिंगणवाडी ते रामटेक या नदीचे खोलीकरणही तातडीने पूर्ण व्हावे म्हणून जलसंधारण विभागाचे अधिकारी शक्य ते प्रयत्न करीत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे.
हिंगणवाडी येथे नदी खोलीकरण
भारतीय जैन संघटना व जलसंधारण विभागांच्या वतीने येथे सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत कारंजा तालुक्यातील ग्राम रामटेक ते हिंगणवाडी राहटी नदीच्या खोलीकरणास १९ जुन पासून सुरवात झाली आहे. नदी खोलीकरणाच्या कामात हिंगणवाडी व राहटी तसेच रामटेक येथील शेतकरी वर्गासह ग्रामस्थांचे मोठया प्रमाणात सहकार्य मिळत जल संधारण विभागाला लाभत आहे. त्यामुळे ही नदी वेगाने गतवैभव प्राप्त करीत असल्याचे दिसते.