संचारबंदी नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:41 AM2021-03-05T04:41:20+5:302021-03-05T04:41:20+5:30
वाशिम : संचारबंदी काळात जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी ...
वाशिम : संचारबंदी काळात जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असतांना शहरातील पुसद मार्गावरील दुकाने पहाटेच उघडत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशांना जिल्हाधिकारी यांनी ८ मार्च २०२१ रोजीच्या सकाळी ८ वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष श्ण्मुगराजन एस. यांनी जारी करून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. असे असतांनासुध्दा पुसद मार्गावरील पानठेले, चहाची दुकाने, हाॅटेल्स पहाटे ५ ते ६ वाजताच्या दरम्यान उघडी असल्याचे दिसून येत आहे. तसेच पुसद चाैकामध्ये रात्रीच्या वेळीही अनेक दुकाने उशिरापर्यंत उघडी दिसून येत आहे. विशेष म्हणजे या महत्त्वाच्या चाैकामध्ये काेणताच पाेलीस कर्मचारी ड्युटीवर दिसून येत नाही. वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे नागरिक बाेलत आहेत.
.................
...असे आहेत संचारबंदीचे नियम
संचारबंदी काळात जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहतील. रोज रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी राहील. या काळात रुग्णालये, रुग्णवाहिका, औषधी दुकाने, ठोक भाजीपाला विक्री, रेल्वे स्थानक व बसस्थानक तसेच खासगी बसने उतरणाऱ्या प्रवाशांकरिता ऑटोरिक्षा, हायवेवरील पेट्रोल पंप, धाबे, एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग सुरू राहतील. या उद्योगाचे कर्मचारी, कामगार यांना त्यांच्या कार्यालयाच्या ओळखपत्राच्या आधारे जाण्या-येण्याकरिता परवानगी राहील.