नियमांचे उल्लंघन; वाशिममधील वाईन शॉपीला ठोकले ‘सील’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:40 AM2020-05-10T10:40:27+5:302020-05-10T10:40:45+5:30
उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी दखल घेऊन ९ मे रोजी एस.एस. जैस्वाल यांच्या वाईन शॉपीला सील ठोकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील एका वाईन शॉपीमध्ये चढ्या दराने होत असलेली मद्यविक्री, शासकीय नियमानुसार ग्राहकास मद्य जवळ बाळगण्याचा परवाना न देणे यासह मद्यविक्री करताना ‘फिजीकल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने ८ मे रोजी उघडकीस आणला होता. या वृत्ताची जिल्हाधिकारी ह्रषीकेश मोडक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी दखल घेऊन ९ मे रोजी एस.एस. जैस्वाल यांच्या वाईन शॉपीला सील ठोकले.
राज्य सरकारने ‘कन्टेनमेंट झोन’ वगळता मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी दिली. त्यानुसार, वाशिम जिल्ह्यात वाईन शॉप , देशी दारू व बियर शॉपीची दुकाने ६ मे पासून सुरू करण्यात आली; मात्र, त्यासाठी प्रशासनाने कठोर नियमही घालून दिले होते; मात्र मद्यविक्री करणारे दुकानदार व ग्राहकांनी ‘फिजीकल डिस्टन्सिंग’ पाळणे बंधनकारक असताना जैस्वाल यांच्या दुकानसमोर त्याचे उल्लंघन झाल्याची बाब दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्या निदर्शनास आली. यासह नियमापेक्षा अधिक दराने मद्यविक्री केली जात असल्याच्या प्राप्त तक्रारींची शहानिशा केली असता हा प्रकारही चौकशीत निष्पन्न झाला. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जैस्वाल यांच्या वाईन शॉपीला ९ मे रोजी सील ठोकण्याची धडक कारवाई केली. या कारवाईमुळे नियम न पाळणाऱ्या अन्य मद्यविक्रेत्यांमध्येही दहशत निर्माण झाली.
वाशिम येथील एस.एस. जैस्वाल यांच्या वाईन शॉपीमधून नियमापेक्षा अधिक दराने मद्यविक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची शहानिशा केली असता, हा प्रकार निष्पन्न झाला. यासह इतरही नियमांचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे अखेर संबंधित मद्यविक्रेत्याच्या दुकानास सील ठोकण्याची कारवाई केली.
- अतुल कानडे
अधीक्षक, राज्य उत्पादक शुल्क