नियमांचे उल्लंघन; बियाणे विक्री परवाना रद्द !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:30 AM2021-06-06T04:30:02+5:302021-06-06T04:30:02+5:30
वाशिम : बियाण्याची जादा दराने विक्री करणे, तपासणीवेळी दस्तऐवज उपलब्ध करून न दिल्याप्रकरणी मालेगाव येथील वसंत कृषी सेवा केंद्राचा ...
वाशिम : बियाण्याची जादा दराने विक्री करणे, तपासणीवेळी दस्तऐवज उपलब्ध करून न दिल्याप्रकरणी मालेगाव येथील वसंत कृषी सेवा केंद्राचा बियाणे विक्री परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश परवाना प्राधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी ४ जून रोजी दिला.
खते, बियाण्यांची विक्री ही शासकीय दरानेच तसेच पॉस मशीनद्वारेच करण्यात यावे, असे निर्देश कृषी विभागाने वारंवार कृषी सेवा केंद्र संचालकांना दिलेले आहेत. खते, बियाण्यांची जादा दराने विक्री तर होत नाही ना? याची पडताळणी म्हणून कृषी विभागाची भरारी पथके तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या चमूतर्फे कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेतली जात आहे. मालेगाव येथील वसंत कृषी सेवा केंद्रातून एका शेतकऱ्याला जादा दराने महाबीजच्या बियाण्याची विक्री झाल्याचे समोर आले. तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, संबंधित कृषी सेवा केंद्राने जादा दराने बियाणे विक्री झाल्याचे तसेच तपासणीदरम्यान आवश्यक ते दस्तऐवज उपलब्ध करून दिले नसल्याचे सिद्ध झाले. याबाबत तालुकास्तरावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी वसंत कृषी सेवा केंद्राचा बियाणे विक्रीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी दिला.
.....
बॉक्स
बियाणे साठा विक्रीसाठी वापरण्यास मुभा
वसंत कृषी सेवा केंद्रात असलेला बियाणे साठा हा कंपनी किंवा विक्रेत्यांना हस्तांतरणद्वारे किंवा मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाची निकड लक्षात घेता विक्री करण्यासाठी २ जुलै २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, विक्री केंद्रावर कोणताही नवीन बियाणे साठा आणता येणार नाही.
०००