दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 11:23 AM2020-08-02T11:23:01+5:302020-08-02T11:23:16+5:30
प्रशासनाच्यावतिने सुध्दा कोणतीच पाहणी केल्या जात नसल्याने दुकानदारही बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दुकानदारांनी ग्राहकांमध्ये किमान ६ फुटचे अंतर राहील याची दक्षता घ्यावी, तसेच एकावेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना आस्थापना अथवा दुकानात प्रवेश देवू नये असे आदेश जिल्हाधिकारी यांचे असतांना प्रशासनाचे दुर्लक्ष व होत नसलेल्या कारवाईमुळे जिल्हाधिकरी यांच्या आदेशाला दुकानदारांनी ‘खो’ दिल्याचे लोकमतच्यावतिने १ आॅगस्ट रोजी केलेल्या पाहणीवरुन दिसून आले.
जल्ह्यात ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत लॉकडाऊन लागू राहणार असून याबाबतची सुधारित नियमावली १ आॅगस्ट २०२० पासून लागू करण्यात आली. यामध्ये पूर्वीप्रमाणेच नियम असून काही बदल करण्यात आले आहेत. दुपारी दोन वाजता होणारी दुकाने आता सायंकाळी ५ वाजता बंद होणार आहेत. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास अथवा दुकानांसह कुठेही गर्दी आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश असताना दुकानदार या आदेशाला जुमानत नसल्याचे शहरातील पाटणी चौक, पाटणी कर्मर्शियल कॉम्पलेक्स, शिवाजी चौकासह शहरातील अनेक ठिकाणी दिसून आले. प्रशासनाच्यावतिने सुध्दा कोणतीच पाहणी केल्या जात नसल्याने दुकानदारही बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करीत आहेत.
रिसोडच्या व्यापाऱ्यांनी घेतली धास्ती
रिसोड शहरामध्ये ईदनिमित्त ३१ जुलै रोजी कापडाच्या दुकानामध्ये मोठया प्रमाणात गर्दी असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. दुकानामध्ये ५ व्यक्तीच्यावर ग्राहक नसावेत असे आदेश असतांना चक्क त्या दुकानामध्ये २५ च्यावर ग्राहक आढळून आले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये कारवाई करण्यात आल्याने रिसोडच्या व्यापाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे रिसोड येथील दुकानातील पाहणीवरुन दिसून आले.