‘पीआरसी’चा दौरा; जि.प.ची लगीनघाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:28 AM2017-08-02T02:28:50+5:302017-08-02T02:29:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विधिमंडळाच्या पंचायत राज समितीचा (पीआरसी) दौरा ऑगस्ट महिन्यात पंधरवड्यानंतर केव्हाही जिल्ह्यात धडकू शकतो. त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेसह पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (ग्रामीण) कामकाजात पारदर्शकता राहावी, शासकीय निधीचा विनियोग योग्य पद्धतीने प्रस्तावित कामांवरच व्हावा, शासकीय नियमात हेराफेरी करणार्यांवर वचक निर्माण व्हावा, गैरप्रकार करणार्यांविरूद्ध कठोर कारवाई व्हावी, आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून पंचायत राज समितीतर्फे स्थानिक स्वराज्य संस्थेला (ग्रामीण) भेट देऊन पाहणी केली जाते. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतसह जिल्हा परिषद अंतर्गत येणार्या सर्वच विभागाची पोलखोल करण्याचे काम पंचायत राज समितीतर्फे केले जाते. दोन महिन्यांपूर्वी अकोला जिल्हा परिषदेला भेट देऊन पंचायत राज समितीने पाहणी केली होती. अकोल्यानंतर आता वाशिम जिल्हा परिषदेला भेट देऊन पंचायत राज समितीची चमू पाहणी करेल, अशी चर्चाही रंगली होती; मात्र याबाबत कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती नव्हती. दरम्यान, आता जिल्हा परिषदेला पंचायत राज समितीच्या दौर्याच्या अनुषंगाने प्रश्नावली प्राप्त झाल्याने हा दौरा ऑगस्ट महिन्यात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. अपवादात्मक परिस्थितीत हा दौरा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही होऊ शकतो, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाने जिल्हा परिषदेच्या काही विभागांचे लेखा परीक्षण करताना काही आक्षेप नोंदविले आहेत. या आक्षेपाच्या दृष्टिने सारवासारव करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या जमा-खर्चाचा हिशेब व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सध्या प्रशासनाची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते.
विविध योजनांतर्गतच्या साहित्याचे वाटप करताना शासकीय नियमांचा भंग तर झाला नाही ना? याचीही पडताळणी पंचायत राज समितीतर्फे होणार असल्याने सर्व ‘रेकॉर्ड’ अद्ययावत ठेवण्यासाठी प्रशासनाची कसरत सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे.
रंगरंगोटी, साफसफाईवर भर
जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमधील अंतर्गतच्या काही भिंतींची रंगरंगोटी करण्यात आली तसेच स्वच्छतागृह व शौचालय गृहाची साफसफाईदेखील करण्यात आली. पंचायत राज समितीच्या दौर्यादरम्यान कुठेही अस्वच्छता राहू नये, दुर्गंंधी येऊ नये याची दक्षता आतापासूनच घेतली जात आहे. स्वच्छतागृह व शौचालय गृहाची नियमित साफसफाई होत असल्याने अधिकारी-कर्मचार्यांसह बाहेरगावावरून येणार्या नागरिकांना या स्वच्छतागृहासमोरून जाताना तूर्तास तरी दुर्गंंधीचा सामना करावा लागत नाही.
पंचायत राज समितीच्या दौर्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाला प्रश्नावली प्राप्त झाली आहे. दौर्याची तारिख अद्याप निश्चित नाही. ऑगस्ट महिन्यात किंवा सप्टेंबर महिन्यात हा दौरा राहण्याची शक्यता आहे.
- प्रमोद कापडे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन)जि.प. वाशिम