ट्रकमधून गावाबाहेरच काढल्या जाताहेत ‘विटा’!
By admin | Published: April 6, 2017 02:08 AM2017-04-06T02:08:22+5:302017-04-06T02:08:22+5:30
विटा सप्लाय करणारे ट्रकचालक गावाच्या बाहेरचं त्यातील काही विटा काढून त्याचा गोरखधंदा करीत असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनवरुन उघडकीस आले आहे.
ग्राहकांना फटका : मोजणी न करताच उतरविल्या जातात विटा
वाशिम: बांधकामासाठी लागणाऱ्या विटा ग्राहक अव्वाच्या सव्वा पैसे देवून खरेदी करतात, मात्र विटा सप्लाय करणारे ट्रकचालक गावाच्या बाहेरचं त्यातील काही विटा काढून त्याचा गोरखधंदा करीत असल्याचे लोकमतने ३ व ४ एप्रिल रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनवरुन उघडकीस आले आहे.
वाशिम शहरात बांधकामासाठी लागणाऱ्या विटा अकोला जिल्हयातील बाळापूर व चोहट्टा बाजार येैथून येतात. सदर विटांची मागणी असल्यास शहरात तसे एजंट आहेत. जागेवरुन माल आणत असतांना मागणीनुसार आणल्या जातो. परंतु विटांचा ट्रक वाशिममध्ये दाखल होण्यापूर्वी गावाबाहेरचं यामधील काही विटा काढून टाकल्या जात आहेत. ३ व ४ एप्रिल रोजी अकोला रस्त्याने हा प्रकार दिसून आला. विटा उतरविल्यानंतर थोडयाच वेळात रस्त्यावर उतरवून ठेवलेल्या विटा एका आॅटोमध्ये टाकून नेल्या जात असल्याचा प्रकार आढळून आला. यासंदर्भात एका ट्रकचालकाशी संवाद साधला असता वाहनातील हवा कमी झाल्याने भार कमी करीत असल्याचे सांगितले.
या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ग्राहकांना वीटा मोजून देतांना हातचलाखी करुन त्या बरोबर जेवढयाची आॅर्डर दिली तेवढयाच मोजून दिल्या जात आहेत.
वाशिम ते मालेगाव रस्त्यावर अनेक ठिकाणी ट्रकमधील विटा काही वेळापुरत्या उतरविल्याचे विटांच्या पडलेल्या तुकडयांवरुन दिसून येते. यासंदर्भात ग्राहक कोणाकडेही काही बोलतांना दिसून येत नाहीत. विटा मोजून घेतांना हजर राहिल्यास या प्रकाराला आळा बसू शकतो.
‘त्या’ विटांची केल्या जातेय विक्री
ट्रकमधून गावाबाहेर काढून ठेवलेल्या विटांची विक्री अनेक एजन्ट कडून खुली केल्या जाते. बांधकाम करतांना कोणास १००० , ५०० विटा कमी पडल्यास ते ग्राहकांना बोलाविणे परवडत नसल्याने शहरातील अनेक भागात विटा विकत मिळतात. त्या सर्वच ट्रकमधून काढलेल्या नसल्या तरी बहुतांश ठिकाणी मात्र असाच प्रकार चालू असल्याचे दिसून येते.