वाशिम जिल्ह्यातील मतदार यादी अंतिम; आता निवडणुकीकडे लक्ष!
By संतोष वानखडे | Published: March 20, 2023 06:57 PM2023-03-20T18:57:36+5:302023-03-20T18:58:14+5:30
वाशिम जिल्ह्यातील सहाही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारांची यादी २० मार्च रोजी अंतिम झाली आहे.
वाशिम : जिल्ह्यातील सहाही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारांची यादी २० मार्च रोजी अंतिम झाली असून, आता निवडणूक कार्यक्रम घोषित केव्हा होणार? याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे. वाशिम, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर, मानोरा व रिसोड या सहा बाजार समित्यांचा कार्यकाळ संपल्याने सध्या तेथे प्रशासकराज आहे. बाजार समिती निवडणुकीपूर्वी सेवा सहकारी सोसायटींची निवडणूक घेण्यात येते.
त्यानंतर सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य हे बाजार समिती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र ठरतात. जिल्ह्यात ४२४ सेवा सहकारी सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया आटोपलेली आहे. दरम्यान, मध्यंतरी १० गुंठ्यापेक्षा अधिक शेती नावावर असणाऱ्या शेतकऱ्यालादेखील मतदानाचा हक्क बहाल करण्याच्या हालचाली वाढल्या होत्या. मात्र, आता शेतकऱ्यांऐवजी पूर्वीप्रमाणेच मतदार राहणार आहेत. सहाही बाजार समित्यांच्या मतदारांची यादी २७ फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आली. ८ मार्चपासून हरकती व सूचना मागविल्या होत्या. या हरकती, सूचना निकाली काढल्यानंतर २० मार्च रोजी मतदार यादी अंतिम करण्यात आली. त्यामुळे आता निवडणूक कार्यक्रम घोषित केव्हा होणार? याकडे सहकार क्षेत्रातील दिग्गजांचे लक्ष लागून आहे.