वाशिम जिल्ह्यात १०४० केंद्रांवर मतदान यादी पुनरीक्षण कार्यक्रम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:49 PM2017-10-13T13:49:47+5:302017-10-13T13:51:06+5:30
वाशिम - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ५ जानेवारी २०१८ पर्यंत राबविला जाणार आहे. यासाठी १०४० केंद्रांची सुविधा उपलब्ध केली असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांची नियुक्तीदेखील करण्यात आली.
मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानुसार प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात आलेली आहे. या यादीवर ३ नोव्हेंबर २०१७ पर्यंत दावे व हरकती करता येणार आहेत. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत ५ डिसेंबर २०१७ पर्यंत आहे. डाटाबेसचे अद्ययावतीकरण २० डिसेंबर २०१७ पर्यंत केले जाणार असून, ५ जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींची मतदार नोंदणी केली जाणार आहे. ३ नोव्हेंबरपर्यंत सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून नवीन मतदार नोंदणी, नावातील किंवा पत्त्यामधील चुकांची दुरुस्ती यासह दुबार नावे, मयत मतदारांची नावे वगळणे आदीसाठी येणारे अर्ज स्वीकारणार आहेत. तहसीलदार कार्यालयात सुध्दा हे अर्ज सादर करता येतील. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातील सर्व १०४० मतदान केंद्रांवर मतदान यादी पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत कामासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली तसेच मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात तक्रार निवारण केंद्राची स्थापना करण्यात आली अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.