१२३ गावांत पोषण अभियानाची शपथ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 06:19 PM2019-09-04T18:19:23+5:302019-09-04T18:19:39+5:30
वाशिम तालुक्यात ४ सप्टेंबर रोजी १२३ गावांत पोषण अभियानाचा जागर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राष्टÑीय पोषण महिना उपक्रमांतर्गत वाशिम तालुक्यात ४ सप्टेंबर रोजी १२३ गावांत पोषण अभियानाचा जागर केला. पोषण अभियानाची शपथ दिली असून, प्रभातफेरीद्वारे जनजागृती करण्यात आली.
पोषण अभियानाच्या माध्यमातून नवजात बालकाच्या पहिल्या हजार दिवसात त्याचे पोषण व्यवस्थितरित्या होणे, स्वच्छता, अॅनेमिया, अतिसार या आजारांवर नियंत्रण मिळविणे, पौष्टीक आहार यासारख्या ५ महत्वपूर्ण घटकांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी वाशिम तालुक्यात एकूण १२३ गावांमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. गावोगावी सार्वत्रिक पोषण अभियानाची शपथ घेण्यात आली. पोषण अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी विभाग प्रमुखांना निर्देश दिले असून, त्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले यांनी १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत कार्यक्रम व उपक्रमांची रूपरेषा निश्चित केली. अंगणवाडी केंद्र, जिल्हा परिषद शाळा, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरी काढण्यात आली. काटा येथे अंगणवाडीतील चिमुकली काव्या देशमुख हिच्या हस्ते या प्रभातफेरीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितिन मोहुर्ले, बाल विकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांच्यासह पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी पोषण आहार, गरोदर, स्तनदा माता, किशोरवयीन मुलींना आरोग्य व पोषण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ३० सप्टेंबरपर्यंत वाशिम तालुक्यामध्ये आरोग्य व पोषण बाबत जनजागृती व मार्गदर्शन केले जाणार आहे. पर्यवेक्षिका अमिता गिºहे, मीनाक्षी सुळे, बी. बी. वानखेडे यांच्यामार्फत ३० सप्टेंबरपर्यंत प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर पोषण महिना राबविण्यात येत आहे, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांनी सांगितले.