वेतनासाठी सी. एम. पी. प्रणाली लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:28 AM2021-07-10T04:28:11+5:302021-07-10T04:28:11+5:30
वाशिम : जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे वेतन नियमित व्हावे, यासाठी सी. एम. पी. प्रणाली (कॅश मॅनेजमेंट प्रोग्राम) लागू ...
वाशिम : जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे वेतन नियमित व्हावे, यासाठी सी. एम. पी. प्रणाली (कॅश मॅनेजमेंट प्रोग्राम) लागू करण्यात यावी, अशी मागणी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर संघटनांच्या एकीकृत समन्वय समितीने शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर यांची वेतन देयके शाळांमधून वेतन पथक कार्यालय येथे सादर केली जातात. त्यानंतर वेतन पथकामार्फत सर्व शाळांचे एकीकृत देयक कोषागार कार्यालयात सादर करण्यात येते. त्यानंतर कोषागार कार्यालय वेतन पथक अधीक्षकांच्या नावाने धनादेश देते. तो धनादेश स्टेट बँकेतून मंजूर होऊन परत ती रक्कम वेतन पथक अधीक्षकांच्या खात्यात जमा करण्यात येते व अधीक्षकांच्या स्वाक्षरीनंतर शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा होते. या सर्व प्रवासाला १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. निवेदन सादर करताना मुख्याध्यापक संघ, शिक्षकेतर संघ , विज्युक्टा ,शिक्षक परिषद, पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक संघर्ष समिती, शिक्षक आघाडी, अमरावती विभागीय शिक्षक संघ ,उच्च माध्यमिक विना अनुदानित कृती समिती, विज्ञान अध्यापक मंडळ , मेस्टा, पविमाशि संघ, प्रयोगशाळा परिचर संघासह विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते. समन्वय समितीच्या मागणीची शिक्षणाधिकारी रमेश तांगडे यांनी दखल घेतली.