ब्लिचिंग पावडरचा साठा न ठेवणा-या अधिका-याची वेतनवाढ रोखली
By Admin | Published: December 2, 2015 02:38 AM2015-12-02T02:38:59+5:302015-12-02T03:18:26+5:30
मानोरा गटविकास अधिका-यांची एका वर्षाची वेतनवाढ रोखण्याची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी सोमवारी केली.
वाशिम : ब्लिचिंग पावडरप्रकरणी वरिष्ठांचे आदेश न पाळणे आणि कर्तव्यात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून मानोरा गटविकास अधिकार्यांची एका वर्षाची वेतनवाढ रोखण्याची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी सोमवारी केली. या कारवाईमुळे कामचुकार अधिकारी व कर्मचार्यांचे धाबे दणाणले असून, यापुढे कामचुकारांवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. मानोरा तालुक्यातील सोमेश्वरनगर, ढोणी, रतनवाडी, धानोरा, कोंडोली, आमगव्हाण, एकलारा, आसोला, रोहणा, मोहगव्हाण, कारपा, पिंपळशेंडा, वडगाव, ज्योतीबानगर, बळीरामनगर, वाईगौळ, सावळी, धावंडा, चाकूर व विठोली या ग्रामपंचायतने सतत एक महिनाभर ब्लिचिंग पावडरचा साठा ठेवला नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनात आले होते. संबंधित ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिस बजावण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिले होते; मात्र या निर्देशांना गांभीर्याने न घेता मानोरा गटविकास अधिकार्यांनी ग्रामसेवकांकडून स्पष्टीकरणही मागितले नाही. कर्तव्यात दिरंगाई आणि वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न केल्याचा ठपका ठेवून गणेश पाटील यांनी गटविकास अधिकार्यांवर एका वर्षाची वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली.