१९0 लाभार्थ्यांना प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षा
By admin | Published: June 3, 2014 08:03 PM2014-06-03T20:03:39+5:302014-06-04T01:24:46+5:30
तालुक्यातील लाभार्थ्यांना ३0 लक्ष ८६ हजार ६00 रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
मालेगाव: विविध रोगराईपासून आरोग्य रक्षण व स्वच्छतेच्या संदेशाचा प्रसारासाठी पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद वाशिम निर्मल भारत अभियानांतर्गत फेब्रुवारी २0१४ ते मे २0१४ पर्यंत ६७१ लाभार्थ्यांना प्रत्येकी ४६00 रुपयांचा प्रोत्साहन भत्ता म्हणून वाटल्या गेला. जवळजवळ तालुक्यातील लाभार्थ्यांना ३0 लक्ष ८६ हजार ६00 रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. गावोगावी स्वच्छता नांदावी, गावातील घाण दूर व्हावी याकरिता ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत प्रोत्साहन म्हणून शौचालय बांधण्याकरिता किंवा बांधल्यानंतर कमी जास्त प्रमाणात निधीचे वाप करण्यात येत होते. आता निर्मल भारत अभियान नावाने ही योजना सुरू असून, २0१२-१३ च्या पायाभूत सर्व्हेनुसार लाभार्थ्यांना लाभ दिल्या जात आहे. गावातील लोक उघड्यावर शौचास बसतात. त्या विष्ठेपासून मानवास ५0 प्रकारचे विविध आजार होण्याची भीती असते . पोलिओ, कावीळ जीवाणूपासून अतिसार, कॉलरा, हगवण, गॅस्ट्रो, विषमज्वर आमांश, आतड्याचे आजार होतात. त्यामुळे लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन त्यांना वापराची सवय लावणे याकरिता शासन प्रयत्नशील आहे. लोकांनी शौचालय वापरले, तर आत्मसन्मान राखला जातो. सामाजिक प्रतिष्ठा उंचावते. स्त्रियांची होणारी कुचंबना टाळल्या जाते. लोकांचा वेळ वाचतो. त्या संडासवर बायोगॅस बसवल्यास ऊर्जेची बचत होते व निर्मल ग्राम पुरस्कारासाठी गावाची निवड होते. आदी आदी फायदे लोकांच्या लक्षात आणून दिल्या जातात. त्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, शेतमजूर, भूमिहीन शेतमजूर, शारीरिक अपंग, महिला कुटुंबप्रमुख असलेल्यांना याचा लाभ दिल्या जातो. मालेगाव तालुक्यात ८४ ग्रामपंचायतीअंतर्गत ११५ गावातील लोकांचा पायाभूत सर्व्हे करण्यात आला. त्यावेळी ३५४७ चे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २१५३ लोकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले. त्यामधील संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करणार्या ६७१ लोकांना याचा प्रत्यक्ष प्रोत्साहन भत्त्याची रक्कम चेकद्वारे वाटण्यात आली. अद्यापही १९0 लोकांच्या प्रस्तावाची जुळवाजुळव सुरू असून, योग्य नमुन्यात प्रस्ताव दिल्यास त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत ४६00 प्रोत्साहन भत्ता व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी (एमआरजीएस) अंतर्गत ५४00 रुपये असे एकूण १0 हजार रुपयांचे वाटप होत असते. सदर अनुदान वाटपाला फेब्रुवारी १४ पासून सुरुवात झाली असून, आजपर्यंत ३0 लाख ८६ हजार ६00 रुपयांचे वाटप केले आहे. तालुक्यात गटविकास अधिकारी संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम कांबळे, गटसमन्वयक रवी पडघान, सुखदेव पडघान, ज्ञानेश्वर महल्ले, विलास मोरे हे कर्मचारी गती देण्याचे काम करत आहेत.