विकलेल्या तुरीच्या मोबदल्याची प्रतीक्षा!
By admin | Published: May 29, 2017 01:15 AM2017-05-29T01:15:15+5:302017-05-29T01:15:15+5:30
शेतकरी अडचणीत: शासकीय केंद्रांकडे २० दिवसांपासून धनादेश स्थगित
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन: चांगले दर मिळतात म्हणून शासकीश खरेदी केंद्रावर तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे. के वळ हमीभावाच्या आशेपोटी तूर विकलेल्या शेतकऱ्यांना मालेगाव्या नाफेड केंद्राकडून गेल्या २० दिवसांपासून मोबदलाच मिळाला नाही. त्यामुळे त्यांचा खरीप हंगाम अडचणीत आला आहे.
मालेगाव तालुक्यातील वाघी बु.येथील भाऊराव गणपत वाघ यांच्यासह १५ ते २० शेतकऱ्यांनी ७ मे रोजी मालेगाव येथील शासकीय खरेदी केंद्रात जवळपास ७५० क्विंटल तूर विकली. या तुरीचे चुकारे चार पाच दिवसांत मिळतील, अशी आशा त्यांना होती. तथापि, आता २० दिवस उलटले तरी, या शेतकऱ्यांना तुरीच्या चुकाऱ्याचे धनादेशच मिळाले नाहीत. यंदा पावसाळा वेळपूर्वीच सुरू होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असताना शेतकऱ्यांच्या हाती पैसा असणे आवश्यक आहे; परंतु शेतमाल विकूनही वेळेवर पैसा मिळत नसल्याने शासन व्यवस्थेला शेतकरी कंटाळून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या २० दिवसांपूर्वी विकलेल्या तुरीचे चुकारे अद्याप मिळाले नाहीच आणि पुढे कधी मिळतील, तेसुद्धा निश्चित नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात पूर्वी नाफेडकडून, त्यानंतर महाराष्ट्र शासनाने स्वत:च्या संस्थेसह सहकारी संस्थांद्वारे तुरीची खरेदी केली. तथापि, खरेदीसाठी आवश्यक रकमेची तरतूद केली नाही.
खरीप हंगामाचे नियोजन बारगळण्याची भिती
शासनाने शेतकऱ्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने शासकीय तुरीची शासकीय खरेदी सुरू केली; परंतु त्यासाठी आवश्यक ते नियोजन केले नाही. त्यामुळे या खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी नुकसानच झाले. वेळोवेळी खरेदीचे स्वरूप बदलणे, संथगतीने मोजणी करणे आणि मोजलेल्या तुरीचे चुकारे वेळेवर न देणे या सर्व गोष्टींमुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. आता महिन्याच्या सुरूवातीला विकलेल्या तुरीचे पैसे अद्यापही न मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ऐन आठवडाभरावर आलेल्या खरीप हंगामाचे नियोजनच बारगळण्याची भिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांनी विकलेल्या तुरीचे चुकारे अदा करणे आवश्यक झाले आहे.