प्रकल्प दुरुस्तीला निधीची प्रतीक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:38 AM2021-04-19T04:38:15+5:302021-04-19T04:38:15+5:30
शेतीला सिंचनाची जोड म्हणून जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातर्फे कोल्हापुरी बंधारे, लघु प्रकल्प, गाव तलावाची निर्मिती केली जाते. रिसोड, वाशिम, ...
शेतीला सिंचनाची जोड म्हणून जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातर्फे कोल्हापुरी बंधारे, लघु प्रकल्प, गाव तलावाची निर्मिती केली जाते. रिसोड, वाशिम, कारंजा तालुक्यात १५० पेक्षा अधिक बंधारे, लघु प्रकल्प असून, देखभाल-दुरुस्ती, बळकटीकरण, सिंचन क्षमता पुनरुज्जीवन, आदींसाठी निधी मिळावा म्हणून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, पुरेशा प्रमाणात निधी मिळाला नाही. प्रकल्पांच्या गेटमध्ये बिघाड, भिंतीवर वाढलेली झाडेझुडपे, तसेच इतर कारणांमुळे दरवर्षी रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळण्यासह इतर अडचणींचा सामना करावा लागतो. गतवर्षीदेखील रब्बी हंगामात अडचणींचा सामना करावा लागला. अशा प्रकल्पांची विशेष दुरुस्ती व बळकटीकरण करण्यासाठी निधी आवश्यक आहे. सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी निधी पुरविला जाईल, असे शासनातर्फे सांगितले जात असले तरी जिल्ह्यातील लघु प्रकल्प दुरुस्ती, बळकटीकरणासाठी पुरेशा प्रमाणात निधी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.