मंगरूळपीर पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:46 AM2021-08-13T04:46:48+5:302021-08-13T04:46:48+5:30
मंगरूळपीर : येथील पंचायत समितीची भव्य नवीन इमारत न्यायालयाच्या बाजूला बांधण्यात आली आहे. मात्र वर्ष उलटले तरी या इमारतीला ...
मंगरूळपीर : येथील पंचायत समितीची भव्य नवीन इमारत न्यायालयाच्या बाजूला बांधण्यात आली आहे. मात्र वर्ष उलटले तरी या इमारतीला लोकार्पणाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाकरिता पंचायत समिती कार्यालयाची भूमिका महत्त्वाची आहे .पंचायत समितीची कार्यालयीन जुनी इमारत अनेक वर्षांपासून तहसील कार्यालयामागे असून, या कार्यालयातूनच सध्या कारभार होत आहे . पंचायत समितीवर अनेक विकासकामांचा ताण आणि वाढती ग्रामीण नागरिकांची गर्दी यामुळे सद्य:स्थितीतील इमारत अपुरी पडत असल्यामुळे शासनाने पंचायत समितीकरिता अनेक बाबींनी सक्षम असलेली नवीन इमारत बांधून पूर्णपणे तयार केली आहे. परंतु नवीन वास्तूच्या उद्घाटन व स्थलांतराचा मुहूर्त मात्र येथील पदाधिकारी व प्रशासनास मिळत नाही आहे. नवीन झालेल्या महामार्गाची रुंदी वाढल्यामुळे जुन्या इमारतीसमोरील पंचायत समिती कार्यालयात कामाकरिता येणाऱ्या नागरिकांना आपले वाहन रस्त्यावर उभे करून कामे उरकावी लागत आहे. सदर वाहने महामार्गावर उभी राहत असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन अपघात होत असतात तसेच पंचायत समिती कार्यालयात प्रवेश करण्यासाठी दुचाकी चारचाकी वाहनाच्या रांगेतून कसरत करून पंचायत समितीमध्ये प्रवेश करावा लागत असल्यामुळे नवीन इमारतीत पंचायत समितीचा कारभार हलविला जाणे आवश्यक आहे. मात्र अद्याप जुन्या इमारतीतच पंचायत समितीचा कारभार सुरू असल्याने नव्या इमारतीचे कधी लोकार्पण होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.