बियाण्यांसाठी महाबीजकडे वेटिंग; विक्रेते, शेतकऱ्यांची धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 12:07 PM2021-05-20T12:07:53+5:302021-05-20T12:08:01+5:30
Mahabeej News : बियाणे एक हजाराने स्वस्त असल्याने या बियाण्यांकडे शेतकऱ्यांसह विक्रेत्यांचाही कल वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : खरीप हंगाम जवळ येत असल्याने बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. दरम्यान, इतर कंपन्यांच्या तुलनेत महाबीजचे (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) सोयाबीन बियाणे एक हजाराने स्वस्त असल्याने या बियाण्यांकडे शेतकऱ्यांसह विक्रेत्यांचाही कल वाढला आहे. त्यामुळे बुकिंग फुल्ल होत असून, बियाणांसाठी वेटिंगवर राहावे लागत आहे.
विविध संकटांतून स्वत:ला सावरत शेतकरी पुन्हा एकदा खरीप हंगामासाठी नव्या जोमाने कामाला लागला आहे. कृषी विभागानेदेखील खरीप पेरणीचे नियोजन केले असून, ४ लाख ६ हजार ४५० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यंदा तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने बांधला असून, त्यादृष्टीने बियाणांचे नियोजन करण्यात येत आहे. दुसरीकडे खताप्रमाणेच विविध कंपन्यांच्या सोयाबीन बियाणांच्या प्रति बॅगचे दरही वाढल्याने शेतकऱ्यांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत. त्या तुलनेत महाबीजची ३० किलो सोयाबीन बियाणे बॅगची किंमतही कमी असल्याने आणि विश्वासार्ह बियाणे असल्याने महाबीजच्या बियाण्याला शेतकऱ्यांसह विक्रेत्यांचीदेखील प्रथमपसंती मिळत आहे. इतर कंपनीच्या ३० किलो सोयाबीन बियाणे बॅगची किंमत ३३५० रुपयांच्या आसपास, तर महाबीजच्या बॅगची किंमत २२५० रुपये असल्याने महाबीजच्या बियाणांसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ शेतकऱ्यांसह विक्रेत्यांवर आली आहे. यंदाच्या खरीप हंगामात १६ हजार ६७० क्विंटल सोयाबीन बियाणे वितरणाचे नियोजन असून, आतापर्यंत १२ हजार ८७६ क्विंटल बियाणांचे बुकिंगही पूर्णत्वाकडे आले.
उर्वरित ३७९४ क्विंटल बियाणे लवकरच प्राप्त होण्याची आशा असून, ते बियाणेदेखील मार्केटमध्ये वितरण करावयाचे आहे.
कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे अनुदानावर देण्यात येणार असून, यासाठी ३२०० क्विंटल लक्ष्यांक निश्चित करण्यात आला. कृषी विभागाकडून यासंदर्भातील पत्रही महाबीजच्या वाशिम जिल्हा कार्यालयाला प्राप्त झाले आहे. महाबीजचे बियाणे मिळावे, यासाठी विक्रेत्यांसह शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. यामुळे बियाणे टंचाई जाणवण्याची चिन्हे आहेत.
विक्रेत्यांकडून पाच महिन्यांपूर्वीच बुकिंग !
पाच महिन्यांपूर्वीच विक्रेत्यांनी महाबीजकडे सोयाबीन बियाणासंदर्भात बुकिंग केले होते. ज्या विक्रेत्यांनी १०० बॅगसाठी अॅडव्हान्स पेमेंट दिले, त्यांना आता केवळ १८ ते २० बॅग मिळत आहेत. महाबीजच्या सोयाबीन बॅगची एमआरपी आणि इतर कंपन्यांच्या एमआरपीमध्ये ११०० रुपयांची तफावत असल्याने बाजारपेठेत साहजिकच महाबीजच्या बियाणांची मागणी वाढली आहे. बुकिंग घ्यायलाही महाबीजकडे बियाणे उपलब्ध नाही, असे काही विक्रेत्यांनी सांगितले.
खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणांची टंचाई भासू नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत. इतर कंपनीच्या तुलनेत महाबीजच्या सोयाबीन बॅगची किंमत कमी आणि विश्वासार्हता असल्याने मागणी प्रचंड वाढली आहे. कृषी विभागाकडूनदेखील शेतकऱ्यांना परमिटवर द्यावयाच्या बियाणांसाठी ३२०० क्विंटलची मागणी प्राप्त झाली आहे. यंदाच्या खरीप हंगामात मार्केटमध्ये १६६७० क्विंटल बियाणे वितरणाचे नियोजन आहे.
- डॉ. प्रशांत घावडे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज वाशिम