स्वस्त धान्यासाठी रखरखत्या उन्हात प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 05:48 PM2020-05-09T17:48:24+5:302020-05-09T17:48:29+5:30
ग्रामस्थ रांगत पिशव्या ठेवून सावलीचा आधार घेत असल्याचे चित्र अनसिंग आणि आसेगाव परिसरात शुक्रवारी दिसून आले.
लोकमत न्युज नेटवर्क
आसेगाव (वाशिम): स्वस्तधान्य दुकानात वेळेत धान्य मिळावे म्हणून ग्रामस्थ रखरखत्या उन्हात गर्दी करीत आहेत. उन्हापासून बचाव व्हावा म्हणून काही ग्रामस्थ रांगत पिशव्या ठेवून सावलीचा आधार घेत असल्याचे चित्र अनसिंग आणि आसेगाव परिसरात शुक्रवारी दिसून आले.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली. त्यात जिवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वेळ निर्धारित करून शिथिलता दिली आहे. किराणा दुकाने, कृषीसेवा केंद्रांसह स्वस्तधान्य दुकानांसाठीही सारखीच वेळ ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थ सकाळपासूनच दुकांनात गर्दी करीत आहेत. त्यात स्वस्तधान्यावर अधिक अवलंबून असलेल्या गरीब ग्रामस्थांची मोठी पंचाईत झाली असून, सकाळपासून रांगेत नंबर लावणाºया ग्रामस्थांना रखरखत्या उन्हातच तासनतास उभे राहावे लागत आहे. त्यात उन्हाचा पारा ४० अंशाच्यावर पोहोचल्याने ग्रामस्थांचा जीव लाही लाही होत असल्याने बहुतांश ग्रामस्थ उन्हापासून बचाव करण्यासाठी रांगेत पिशव्या ठेवून सावलीचा आधार घेत असल्याचे चित्र आसेगाव आणि अनसिंग परिसरात दिसून येत आहे. रखरखत्या उन्हामुळे होणारा त्रास लक्षात घेता सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ७ अशा वेळेत स्वस्तधान्य वितरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
किराणासाठीही ग्रामस्थांची लाही लाही
गोरगरीब ग्रामस्थ रखरखत्या उन्हात स्वस्तधान्य घेण्यासाठी प्रतिक्षा करीत असल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागांत दिसत आहेच शिवाय किराणा दुकानांतही वेळेत साहित्य मिळावे म्हणून ग्रामस्थ धावाधाव करीत असून, मोठ्या प्रमाणात ग्राहक येत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगच्या पालनासाठी दुकानदार ग्राहकांना रांगेत उभे करीत आहेत. यामुळे किराणा दुकानांसमोरही रखरखत्या उन्हात ग्रामस्थांच्या जिवाची लाही लाही होत असल्याचे दिसत आहे.