४५ हजार शेतकऱ्यांना सोयाबीन अनुदानाची प्रतीक्षा

By admin | Published: July 12, 2017 01:42 AM2017-07-12T01:42:34+5:302017-07-12T01:42:34+5:30

पणन संचालकांकडे प्रस्ताव : १४ कोटी ७९ लाखांची मागणी

Waiting for soybean donation to 45 thousand farmers | ४५ हजार शेतकऱ्यांना सोयाबीन अनुदानाची प्रतीक्षा

४५ हजार शेतकऱ्यांना सोयाबीन अनुदानाची प्रतीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासनाच्या निर्णयानुसार १ आॅक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीमध्ये बाजार समित्यांकडे सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये प्रमाणे अनुदान देण्याचे ठरले आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांसह तालुका सहायक निबंधकांनी प्रस्तावांची पडताळणी केल्यानंतर एकूण ४५ हजार ४३३ शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत पणन संचालकांकडे पाठविण्यात आले असून, या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी १४ कोटी ७९ लाख १३ हजार ५९२ रुपयांच्या अनुदानाची मागणी नोंदविण्यात आली आहे. या अनुदानाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.
शासनाने मागील वर्षीच्या खरीप हंगामात बाजार समितीत १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये आणि कमाल २५ क्विंटल पर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भातील प्रस्ताव ३१ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांकडून मागवून जिल्हा उपनिबंधकांमार्फत पणन संचालकांकडे २८ फेब्रुवारीपर्यंत पाठविणे आवश्यक होते. याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून बाजार समित्या आणि तालुका सहायक निबंधकांना वारंवार सूचना देऊन प्रस्ताव तातडीने पाठविण्यास सांगण्यात आले.
यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून तालुका सहायक निबंधक आणि तालुकास्तर समित्यांना १० पत्रे आणि ४ अतिरिक्त शासकीय पत्रेही पाठविण्यात आली. तथापि, त्यांच्याकडून विहित वेळेच्या आत सदर प्रस्तावांची छानणी करून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविण्यात आले नाही, त्यामुळे पणन संचालकांकडून शासनाकडे निधीची मागणी नोंदविण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास अपेक्षित रक्कम आणि प्रस्तावांची संख्या सादर करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सोयाबीन अनुदानासाठी अंदाजे १६ कोटी रुपयांची मागणीही नोंदविण्यात आली.
आता जिल्हाभरातील सोयाबीन अनुदानाच्या प्रस्तावांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वीच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वच तालुक्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे प्रस्ताव पणन संचालक पुणे यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ४५ हजार ४३३ शेतकरी अनुदानासाठी पात्र असून, या शेतकऱ्यांनी १ आॅक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधित बाजार समित्यांकडे विकलेल्या एकूण ७ लाख ३९ हजार ५६७ क्विंटल ९६ किलो सोयाबीनच्या अनुदानासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला १४ कोटी ७९ लाख १३ हजार, ५९२ रुपयांच्या निधीची गरज आहे.
जिल्हा उपनिबंधकांनी पाठविलेल्या प्रस्तावांची पडताळणी करून पणन संचालकांमार्फत शासनाकडे अनुदानासाठी निधीची मागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेला आणखीही विलंब लागणार असल्याने सोयाबीन अनुदानासाठी आणखी प्रतीक्षा करावीच लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

शासनाच्या निर्णयानुसार बाजार समित्यांमध्ये १ आॅक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ दरम्यान सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी अंतिम प्रस्ताव पणन संचालकांकडे पाठविले आहेत. या प्रस्तावांच्या पडताळणीची प्रक्रिया काळजीपूर्वक करणे आवश्यक होते. त्यामुळे तालुका स्तरावर विलंब लागला.
- रमेश कटके
जिल्हा उपनिबंधक, वाशिम

Web Title: Waiting for soybean donation to 45 thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.