पालकमंत्री सिंचन विहिर योजनेच्या मजुरांना मोबदल्याची प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:37 PM2018-04-09T13:37:29+5:302018-04-09T13:37:29+5:30
वाशिम - पालकमंत्री सहस्त्र सिंचन योजनेंतर्गत सन २०१७ मध्ये मंजूर वांगी येथील १२ विहीरीवर काम करणाºया मजुरांना त्यांच्या मजुरीचे पैसे न मिळाल्याने मजूरवर्ग वैतागला आहे.
वाशिम - पालकमंत्री सहस्त्र सिंचन योजनेंतर्गत सन २०१७ मध्ये मंजूर वांगी येथील १२ विहीरीवर काम करणाऱ्या मजुरांना त्यांच्या मजुरीचे पैसे न मिळाल्याने मजूरवर्ग वैतागला आहे. सदर मजुरीचे पैसे वाशिम पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजना विभागाने आॅनलाईन पध्दतीने जमा केल्याचे दाखविल्या जाते; परंतु ही रक्कम मजुरांच्या बँक खात्यात जमा न झाल्याने मजूर वर्ग चकीत असून, ही रक्कम गेली कोठे, हा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होत आहे. मजुरांच्या खात्यात त्यांचा मोबदला त्वरित जमा करा अशी मागणी पंचायत समिती सदस्य भागवत भोयर यांनी गटविकास अधिकारी वाशिम यांच्याकडे सोमवारी केली.
वाशिम तालुक्यातील वांगी येथील शामराव झाटे, सुभाष भोयर, सिंधु भायर, गोविंदा भोयर, विमला भोयर, गोपाल भोयर, दत्तू भोयर, सुमन भोयर, गजानन भोयर, गजानन वाकुडकर, लता वाकुडकर, यांना २०१७ मध्ये पालकमंत्री सहस्त्र सिंचन योजनेंतर्गत विहीरी मंजुर झाल्या आहेत. त्यांनी त्या विहिरींचे खोदकाम केले व या विहिरींवर काम करणाऱ्या मजुराचे हजेरी पत्रक आॅनलाईन भरल्या गेले व त्याचे आॅनलाईन पेमेंटही टाकण्यात आले, असे आॅनलाईनला दिसते; परंतु मजुरांच्या खात्यावर सदर पैसे जमा झाले नाही. त्यामुळे मजुरांच्या मोबदल्याच्या रकमेचे झाले काय, हा प्रश्न मजुरांना पडला असून, केलेल्या कामाचा मोबदला वेळेत मिळत नसल्याने विहीरींची कामेही करण्यास मजूरवर्ग मागेपुढे पाहत आहे, तसेच मजुरांच्या खात्यात रक्कम जमा होत नाही तोवर तांत्रिकदृष्ट्याही पुढे काम करणे शक्य नाही. मजुरांच्या हाताला काम व त्वरित कामाचे दाम मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी कायदा अंमलात आणला. त्यानंतर या कायद्यात सुधारणा करून या योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना त्यांच्या कामाचा मोबदला त्वरीत मिळण्याची तरतूदही केली आणि मजुरांचा मोबदला आॅनलाईन पद्धतीने चुकविण्यास सुरुवात केली; परंतु आता त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून मिळणाऱ्या मजुरीची रक्कम आॅनलाइन पद्धतीने संबंधित प्रशासनाकडून बँकेकडे पाठविल्याचे दिसते; परंतु मजुरांच्या खात्यात मात्र ती रक्कम दिसत नाही. त्यामुळे ही आॅनलाईन पद्धती अडचणीची ठरत आहे. दरम्यान, या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानी या प्रकरणात लक्ष घालून मजुरांचा मोबदला अदा करण्याच्या सुचना संबंधित विभागाला द्याव्यात, अशी मागणी मजूरवर्ग करीत असून, या संदर्भात पंचायत समिती सदस्य भागवत भोयर यांनीही वाशिम पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याकडे निवेदन सादर करीत मजुरांचा मोबदला तात्काळ अदा करण्याची मागणी केली आहे.