कठीण परिश्रमातून वाईंडरचा मुलगा झाला तुरूंगाधिकारी!
By admin | Published: August 23, 2016 11:40 PM2016-08-23T23:40:59+5:302016-08-23T23:40:59+5:30
रिसोड तालुक्यातील युवकांने निराश विद्यार्थ्यांंसमोर ठेवला आदर्श.
शीतल धांडे
रिसोड(जि. वाशिम), दि. २३: घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना मनात जीद्द आणि अपार कष्ट करण्याची तयारी ठेवल्याने एका वाईंडरच्या मुलाने चक्क तुरुगांधिकारी पदापर्यंंत मजल मारली. येथील भारत प्राथमिक मराठी शाळेत शिक्षण घेतलेल्या विठ्ठल रघुनाथ पवार या युवकाची ही यशोगाथा परिस्थितीपुढे खचलेल्या विद्यार्थ्यांंसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
विठ्ठल यांनी दिवस-रात्र कठीण परिश्रमातून अभ्यास करित मोठय़ा पदाला गवसणी घालण्याचे स्वप्न बाळगले. ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी वाट्टेल ते करण्याची जीद्द अंगी बाळगल्यामुळेच आपणास हे यश संपादन करणे शक्य झाले, असे विठ्ठल पवार यांनी सांगितले. शिक्षण घेत असतानाच सन २0१४ मध्ये वडिलांचे अचानक निधन झाले. मात्र, वडिलांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे ध्येय बाळगून अभ्यासाकडे पूर्ण लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे आपणास स्पर्धा परिक्षेत यश संपादन करून तुरूंगाधिकारी होता आले, असेही विठ्ठल पवार म्हणाले.
पवार यांचे प्राथमिक शिक्षण रिसोडच्या भारत प्राथमिक मराठी शाळेत झाले. १२ वीपर्यंंंंंत शिक्षण रिसोड येथे पूर्ण करून विज्ञान शाखेतून त्यांना ९१ टक्के गुण मिळाल्याने संगणक अभियंता या शाखेत जवाहरलाल दर्डा इन्स्टीटयुट ऑफ इंजीनिअरिंग अँन्ड टेक्नॉलॉजी, यवतमाळ या कॉलेजमध्ये गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळाला. संगणक अभियंता ही पदवी प्राप्त करुन पवार यांनी स्पर्धा परिक्षेची जोरदार तयारी सुरु केली. कौटूंबिक अडचणीचा सामना करीत सन २0१४ मध्ये तुरुगांधिकारी पदाची परिक्षा दिली. त्यातील लेखी परिक्षेत १00 पैकी ९१ टक्के गुणांनी उत्तीर्ण झालो. आपल्या कठीण काळात शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी जावाई बबन आव्हाळे व सासरकडील मंडळींनी मोठा आर्थिक हातभार दिल्यानेच हे यश संपादन करणे शक्य झाल्याचा उल्लेखही विठ्ठल पवार यांनी केला.