महाबिज बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:29 AM2021-05-28T04:29:43+5:302021-05-28T04:29:43+5:30
तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मागीलवर्षी बनावट बियाण्यांचा मोठा फटका सहन केलेला असल्यामुळे यावर्षी बनावट बियाण्यांचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसू नये, ...
तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी मागीलवर्षी बनावट बियाण्यांचा मोठा फटका सहन केलेला असल्यामुळे यावर्षी बनावट बियाण्यांचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसू नये, यासाठी शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आभासी नोंदणी कृषी विभागाकडे बियाण्यांसाठी केलेली आहे. मानोरा तालुक्यातील शेतकरी महाबिज बियणे मिळविण्यासाठी प्रत्येक कृषी केंद्राच्या पायऱ्या झिजवत असून, एकही कृषी केंद्र चालक महाबिज बियाणे देण्यास तयार नसल्याचे आरोप परिवर्तन शेतकरी संघटनेने केला आहे. मानोरा येथील खासगी बियाणे वितरक, कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी खरेदी-विक्री संघात बियाणे उपलब्ध असतानाही खासगी व्यापारी व खरेदी-विक्री संघ बियाणे वाटप करण्यास तयार नाही. याबाबत कृषी प्रशासनाने त्वरित दखल घेऊन शेतकऱ्यांना महाबिजचे सोयाबीन बियाणे उपलब्ध करून देऊन तालुक्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची भटकंती थांबविण्याची मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेने केली आहे. महाबीज बियाणे उपलब्ध असून, शासकीय अनुदान प्राप्त होताच तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून रितसर परमीट मिळाल्यानंतर पुढील काही दिवसांत बियाण्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी मकासरे यांनी कळविले.