सिलिंडर महागल्याने सरपणासाठी महिलांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:16 AM2021-03-13T05:16:29+5:302021-03-13T05:16:29+5:30
गेल्या काही महिन्यांत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. सद्य:स्थितीत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर ८२५ रुपयांपर्यंत पोहोचले ...
गेल्या काही महिन्यांत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. सद्य:स्थितीत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर ८२५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे गोरगरिबांसह मध्यमवर्गीयांनाही सिलिंडरवर स्वयंपाक करणे आता परवडणारे राहिले नाही. उज्ज्वला योजनेंतर्गत सिलिंडर मिळालेल्या कुटुंबांची स्थिती तर अधिकच गंभीर आहे. या कुटुंबातील महिला सिलिंडर बाजूला ठेवून आता चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहेत. चूल पेटविण्यासाठी सरपणाची गरज असल्याने रखरखत्या उन्हात महिला मंडळी जंगलात भटकंती करून दोन-दोन किलोमीटर अंतरावरून डोक्यावर काटक्यांच्या मोळ्या घेऊन येत असल्याचे चित्र इंझोरी परिसरात पाहायला मिळत आहे.
----------------
भटकंती करताना उष्माघाताची भीती
कुटुंबाचा स्वयंपाक करण्यासाठी सिलिंडरमध्ये गॅसच नसल्याने घरी चूल पेटविण्यासाठी महिला रानावनात भटकून सरपण आणत आहेत. त्यात सद्य:स्थितीत उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. अशाच उन्हात या महिला जंगलात काड्या गोळा करून त्या डोक्यावरून दोन किलोमीटर अंतरापर्यंत घेऊन येत आहेत. रखरखत्या उन्हात शरीरातील पाण्याची पातळी खालावण्यासह रखरखत्या उन्हात दोन किलोमीटरचे अंतर कापताना या महिलांच्या शरीरातील त्राण गळून त्यांना उष्माघाताचा फटकाही बसण्याची भीती आहे.
--------
कोट : शासनाने उज्ज्वला योजनेत मोफत सिलिंडर दिले आणि आता गॅसचे दर वाढविले. सिलिंडरचे दर सध्या ८१५ रुपयांच्या वर आहेत. मोलमजुरी करणाऱ्यांना हे परवडणारे नाही. त्यामुळे आम्ही रखरखत्या उन्हात रानावनात भटकंती करून डोक्यावर सरपण आणून चुलीवर स्वयंपाक करीत आहोत.
- बेबीबाई हळदे,
महिला, इंझोरी