वार्ड निश्चिती व आरक्षण सोडतीवर मागविले आक्षेप!
By Admin | Published: July 6, 2017 01:19 AM2017-07-06T01:19:49+5:302017-07-06T01:19:49+5:30
२८९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक : ११ जुलै अंतिम मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पाच वर्षांचा कालावधी संपत आल्याने जिल्ह्यातील जवळपास २८९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. तत्पूर्वी ग्रामसभेतून वार्ड निश्चिती व आरक्षण सोडत काढण्यात आली असून, आता यावर ११ जुलैपर्यंत आक्षेप व सूचना मागविल्या आहेत.
ग्रामीण भागातील राजकारण ढवळून काढणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. प्रतिष्ठा जपण्यासाठी गावातील दिग्गज मंडळी ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी सर्व कसब पणाला लावते. जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत असल्याने आतापासूनच राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. वाशिम तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती, कारंजा तालुक्यातील ५८, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ४५, अशा एकूण २८९ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ डिसेंबर २०१७ मध्ये संपणार आहे. आॅक्टोबर किंवा नोव्हेंबर २०१७ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात असून, तत्पूर्वी सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्यासाठी जून महिन्यात गावपातळीवर ग्रामसभा घेण्यात आल्या. या ग्रामसभेतून वार्ड निश्चिती व आरक्षण सोडत काढण्यात आली. यावर कुणाचा आक्षेप राहू नये म्हणून संबंधित गावातील नागरिकांना आक्षेप व सूचना नोंदविण्यासाठी ११ जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर १५ जुलैपर्यंत प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर कराव्या लागणार आहेत. २५ जुलैपर्यंत आलेल्या प्रत्येक हरकती व सूचनांवर सुनावणीनंतर अभिप्रायासह अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देणे अपेक्षित आहे.
दरम्यान, २८९ गावांतील राजकारण तापत असून, आतापासूनच फिल्डिंग लावली जात आहे. २०१८ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होत असल्याने, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांची ग्रामपंचायत निवडणुकीत कसोटी लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालिम ठरणार असून, आतापासूनच राजकीय घडामोडींनी वेग घेतल्याचे दिसून येते.
दृष्टिक्षेपात वाशिम तालुका...
वाशिम तालुक्यातील अंजनखेड, चिखली खु., सापळी, सोनखास, खंडाळा खु., धानोरा बु., भटउमरा, पांडव उमरा, घोटा, राजगाव, हिस्से बोराळा, शिरपुटी, जवळा, सावळी, मोहजा रोड, सावरगाव बर्डे, कोंडाळा म., खरोळा, धानोरा खु., शेलगाव, बोरी बु., आसोला, गणेशपूर, वाघोली बु., वाई, चिखली बु., कार्ली, सुराळा, गोंडेगाव, शेलु बु., जयपूर, नागठाणा, जुमडा, जांभरूण महाली, फाळेगाव थेट, देपूळ, सोंडा, सुकळी, धुमका, कृष्णा, ढिल्ली, जांभरूण प., हिवरा रोहिला, तांदळी शेवई, साखरा, सुपखेला, उमरा श., बाभूळगाव, उमरा कापसे, ब्राह्मणवाडा, कोकलगाव व टणका येथील ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. यापैकी हिवरा रोहिला, कोकलगाव, राजगाव, धानोरा खुर्द, नागठाणा, सुपखेला, तांदळी शेवई, बाभूळगाव, गोंडेगाव, कोंडाळा महाली येथील निवडणूक विशेष लक्षवेधी ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दृष्टिक्षेपात मालेगाव तालुका...
मालेगाव तालुक्यातील अमानी, भेरा, डव्हा, देवठाणा खांब, गिव्हा कुटे, इरळा, नागरदास, सोनाळा, उडी, वाडी, वडप, एरंडा, भौरद, दूधाळा, दुबळवेल, खंडाळा शिंदे, कोठा, शेलगाव बोदाडे, पांगराबंदी, सुदी, सोमठाणा, तरोडी, झोडगा बु., बोर्डी, किन्ही घोडमोड, कवरदरी, बोराळा, कार्ली, बोरगाव, ब्राम्हणवाडा, चांडस, माळेगाव, हनवतखेडा, जामखेड, मसला, मैराळडोह, पिंपळा, सुकांडा, वाघी बु., केळी, आमखेडा, कुरळा, कोळगाव बु., पांगरी धनकुटे, पांगरखेडा, रिधोरा, शेलगाव बगाडे, वाघळूद, रेगाव या ४८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. या दृष्टिकोनातून आतापासून ‘राजकारण’ तापण्यास सुरूवात झाली आहे.
दृष्टिक्षेपात रिसोड तालुका...
गोहोगाव, शेलगाव, आसेगाव,घोन्सर, मांगवाडी, किनखेडा, चाकोली, अंचळ, कुऱ्हा, कोयाळी, दापुरी खु., घोटा, धोडप खु., पार्डी तिखे, येवता, महागाव, धोडप खु., वाघी खु., निजामपूर, जवळा, देवगाव, बोरखेडी, कळमगव्हाण, कुकसा, कोयाळी बु., जोगेश्वरी, वडजी, भापूर, मोहजा इंगोले, मांडवा, बाळखेड, पेनबोरी, कोयाळी खु., वाडी रायताळ, गणेशपूर, लिंगा कोतवाल, पिंपरखेड, जांब अढाव, पिंप्री सरहद, बेलखेडा, मोहजा बंदी, मोरगव्हाण, लेहणी, हिवरा पेन, लोणी खु, येथे निवडणूक होणार असल्याने ‘फिल्डिंग’ लावली जात आहे.
दृष्टिक्षेपात कारंजा तालुका...
कारंजा तालुक्यातील लोणी अरब, बेलमंडळ, अंतरखेड, भिवरी, आखतवाडा, खानापूर, वाघोळा, बेलखेड, दोनद बु., किनखेड, दिघी, धनज खु., इंझा, लोहगाव, भुलोडा, पिंपळगाव बु., तारखेडा, पोहा, वापटी व पारवा कोहर, निंभा जहा., वाल्हई, बांबर्डा, धोत्रा जहॉ., दादगाव, पलाना, वडगाव ई, म्हसला, वडगाव रंगे, लोहारा, यावर्डी, पिंप्री वरघट, धानोरा ताथोड, शिवण बु., गिर्डा, कामठा, धोत्रा (देश), झोडगा व हिवरा लाहे, मनभा, वढवी, मोखड पिंप्री, डोंगरगाव, खेर्डा कारंजा, काकडशिवणी, पसरणी, टाकळी खु., वीरगव्हाण, जयपूर, सुकळी, महागाव, विळेगाव, जांब, शहा, कामठवाडा, जानोरी, ब्राह्मणवाडा व ढंगारखेडा येथे ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने ग्रामसभा घेऊन प्रभाग रचना व आरक्षण सोडत कार्यक्रम राबविण्यात आला. अनु. जाती, अनु. जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला आरक्षण सोडत काढली आहे. यावर कुणाचा आक्षेप राहू नये, म्हणून नागरिकांकडून हरकती व आक्षेप मागविले जातील. हरकतीचे निराकरण झाल्यानंतर प्रभाग रचना व आरक्षण सोडत निश्चित केली जाणार आहे.