वार्डातील कचरा टाकला नगर पालीकेत!
By admin | Published: July 5, 2017 01:47 PM2017-07-05T13:47:06+5:302017-07-05T13:47:06+5:30
कचरा नगरपरिषद नगराध्यक्ष यांच्या कक्षात व मुख्याधिकारी यांच्या कक्षासमोर टाकून आपला रोष व्यक्त केला.
नियोजन सभापतींनी गोळा केला कचरा: नगरपरिषदेच्या कार्याबाबत केला युवकांनी व्यक्त रोष
वाशिम : शहरात होत असलेला कचरा व उचलण्यासाठी असलेल्या घंटागाडया बंद यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात वेळोवेळी नगरपरिषद प्रशासन, नगराध्यक्ष यांना निवेदन देवूनही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ खुद्द नियोजन सभापती अमित मानकर यांनी युवकांना सोबत घेवून वार्डातील कचरा जमा केला. सदर कचरा नगरपरिषद नगराध्यक्ष यांच्या कक्षात व मुख्याधिकारी यांच्या कक्षासमोर टाकून आपला रोष व्यक्त केल्याची घटना ५ जुलै रोजी १० वाजताच्या दरम्यान घडली. वाशिम शहरातील वार्ड क्रमांक दहाचे नगरसेवक तथा नियोजन सभापती अमित मानकर यांच्या वार्डामध्ये घंटागाडया येत नसल्याने मोठया प्रमाणात कचरा जमा होत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने मानकर यांनी नगराध्यक्ष, प्रशासनाकडे निवेदन देवून घंटागाडी सुरु करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. परंतु या निवेदनाची दखल घेतल्या जात नसल्याने स्वताच्या वार्डासह शहरातील कचरा जमा केला. विशेष म्हणजे यावेळी मानकर यांनी स्वता कचरा घेवून जाणारा ट्रॅक्टर चालविला. नागरिकांनी मानकर यांच्या उपक्रमाचे कौतूक केले असले तरी विरोधक नियोजन सभाापती यांच्या वार्डातील कचराच उचलण्यासाठी ते सक्षम नाही तर शहराचे नियोजन कश्याप्रकारे करणार यावर बोलतांना दिसून येत आहेत. विरोधक काहीही चर्चा करीत असले तरी सर्वसामान्य जनतेतून मात्र मानकर यांनी उचलले पावलाबाबत नागरिक समाधान व्यक्त करतांना दिसून येत आहेत. शहरात फिरत असलेल्या घंटागाडया अनेक दिवसांपासून शहरात फिरत नसल्याची तक्रार अनेक नागरिकांची दिसून येत आहे. तसेच घंटागाडयांची संख्या सुध्दा कमी झाली आहे. ज्या कंत्राटदााराला घंटागाडयांचे कंत्राट दिले आहे त्यांचे बिलेच काढण्यात न आल्याने शहरातील घंटागाडया बंद असल्याची माहिती आहे. या संदर्भात नगराध्यक्ष अशोक हेडा व नगरपरिषद मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद आढळून आला.