गोदामे भरून असल्याने हमालांचा हिरावल्या गेला रोजगार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 04:50 PM2017-11-28T16:50:44+5:302017-11-28T16:53:04+5:30
शेतकऱ्यांचा माल ठेवण्यासाठी तसूभरही जागा शिल्लक राहिलेली नाही. यामुळे हमालांना मिळणारे दैनंदिन कामही बंद झाले असून त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ ओढवल्याचे चित्र वाशीम जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: वखार महामंडळाच्या येथील गोदामांमध्ये हजारो क्विंटल तूर साठविण्यात आलेली असून नव्याने खरेदी केल्या जाणारे सोयाबिन आणि शेतकऱ्यांचा माल ठेवण्यासाठी तसूभरही जागा शिल्लक राहिलेली नाही. यामुळे हमालांना मिळणारे दैनंदिन कामही बंद झाले असून त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ ओढवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
वाशिम येथील वखार महामंडळाच्या गोदामात आजरोजी १ लाखापेक्षा अधिक क्विंटल तूर आणि काही प्रमाणात सोयाबिन साठविण्यात आलेले आहे. वास्तविक पाहता नव्याने नाफेडमार्फत सोयाबिन खरेदीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी हा माल येथून हलविणे आवश्यक होते. मात्र, त्याची व्यवस्था अद्यापही लागलेली नाही. त्यामुळे हमालांच्या हाताला काम न मिळण्यासोबतच नव्याने खरेदी केलेले जाणारे सोयाबिन आणि शेतकऱ्यांचा माल साठविण्यासाठी देखील जागा उपलब्ध नसल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
१२ हमालांच्या रोजीरोटीचा प्रश्न!
वखार महामंडळाच्या गोदामावर सद्या १२ हमाल कार्यरत आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या हाताला काम उपलब्ध नाही. त्यामुळे नाईलाजास्तव गोदामातील पोत्यांवरच दिवसभर आराम करून घरी परतावे लागत आहे. यामुळे रोजमजूरी देखील मिळत नसल्याने उपासमार ओढवत असल्याचे त्यांनी सांगितले.