वाशिम : १७ उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 02:49 PM2019-10-04T14:49:57+5:302019-10-04T14:50:03+5:30
४ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी प्रमुख उमेदवारांसह अपक्षांची गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३ आॅक्टोबरपर्यंत १७ उमेदवारांनी २५ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल केले आहेत. यामध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघात सहा उमेदवारांनी आठ अर्ज, वाशिममध्ये तीन उमेदवारांनी तीन अर्ज आणि कारंजा मतदारसंघात ८ उमेदवारांच्या १४ अर्जांचा समावेश आहे. दरम्यान, ४ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी प्रमुख उमेदवारांसह अपक्षांची गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.
जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, कारंजा या तीन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या सातव्या दिवशी अर्थात ३ आॅक्टोबर रोजी रिसोड विधानसभा मतदारसंघातून सोनाली प्रकाश साबळे (अपक्ष), महादेव पांडुरंग मुसळे (अपक्ष), तसव्वरखॉ गुलाम गौसखॉ (एमआयएम), प्रशांत गावंडे (संभाजी ब्रिगेड पार्टी), दिलीप रामभाऊ जाधव (वंचित बहुजन आघाडी) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी या मतदारसंघातून प्रशांत विष्णू बकाल (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
कारंजा विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेंद्र पाटणी (भाजपा), चंद्रकांत ठाकरे (राकाँ/अपक्ष), युसूफ पुंजानी (बसपा/अपक्ष), अण्णासाहेब शेंडगे (अपक्ष), डिगांबर चव्हाण (अपक्ष), मनिष मोडक (प्रहार जनशक्ती), माणिक पावडे (संभाजी ब्रिगेड) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यापूर्वी येथे मुरलीधर पवार (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केला होता. वाशिम विधानसभा मतदारसंघातून आमदार लखन मलिक (भाजप), सुरेश प्रकाश राजगुरू (अपक्ष), भागवत रणबावळे (अपक्ष) अशा उमेदवारांनी अर्ज दाखल केला.
दरम्यान, ३ आॅक्टोबरपर्यंत तिनही विधानसभा मतदारसंघातून २५२ उमेदवारांनी ३०४ उमेदवारी अर्जाची उचल केली आहे. यामध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघातून ४७ उमेदवारांनी ९० अर्ज, वाशिम मतदारसंघातून ६१ उमेदवारांनी ७० अर्ज आणि कारंजा मतदारसंघातून सर्वाधिक १४४ उमेदवारांच्या १४४ अर्जांचा समावेश आहे.