Washim: अमृत योजनेतून २० कोटी मंजूर; रेल्वेस्थानक होणार ‘हायटेक’, रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा झेंडा
By सुनील काकडे | Published: August 4, 2023 06:47 PM2023-08-04T18:47:56+5:302023-08-04T18:48:16+5:30
Washim: रेल्वे मंत्रालयाने देशभरातील स्थानकांच्या विकासाकरिता अमृत भारत स्थानक योजना अंमलात आणली. याअंतर्गत वाशिम रेल्वेस्थानकाच्या सौदर्यीकरणासोबतच पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
- सुनील काकडे
वाशिम : रेल्वे मंत्रालयाने देशभरातील स्थानकांच्या विकासाकरिता अमृत भारत स्थानक योजना अंमलात आणली. याअंतर्गत वाशिम रेल्वेस्थानकाच्या सौदर्यीकरणासोबतच पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून वाशिमचे रेल्वेस्थानक ‘हायटेक’ होणार असल्याची आशा पल्लवित झाली आहे. या उपलब्धीसाठी खासदार भावना गवळी यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला, हे विशेष.
कधीकाळी नॅरोगेज असलेला वाशिमचा रेल्वेमार्ग मध्यंतरीच्या काळात ‘ब्राॅडगेज’मध्ये रुपांतरीत झाला. तेव्हापासून वाशिममार्गे उत्तर ते दक्षिणेकडील सर्व राज्यांमध्ये जाणाऱ्या रेल्वेगाड्या उपलब्ध झाल्या. परिणामी, रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली; मात्र या ठिकाणी प्रवाशांना अपेक्षित सुविधा उपलब्ध झालेल्या नव्हत्या. यासंदर्भात खासदार गवळी यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सतत पाठपुरावा केला. त्याचे अपेक्षित फलित होत रेल्वे मंत्रालयाने वाशिम रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी अमृत भारत स्थानक योजनेतून २० कोटींचा निधी मंजूर केला आहे. ६ ऑगस्ट रोजी आभासी पध्दतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेचा रितसर शुभारंभ झाल्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरूवात होणार असल्याची माहिती वाशिम रेल्वेस्थानकाच्या मुख्य वाणिज्य निरीक्षक कमलनयन मृणाल यांनी दिली.
२० कोटीच्या निधीतून ही कामे होणार
मंजूर झालेल्या २० कोटी रुपयांच्या निधीतून रेल्वे स्थानक इमारतीचे नुतनीकरण, परिसर सुशोभीकरण, विद्युतीकरण, प्रशस्त वेटींग हॉल, पार्किंग व्यवस्था, स्वयंचलित जिन्याची उभारणी करुन स्थानकाच्या रचनेत सुधारणा, स्थानकात प्रशस्त बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, तिकिट खिडकीचे विस्तारीकरण आदी कामे केली जाणार आहेत.
अमृत भारत स्थानक योजनेतून रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. उपलब्ध निधीतून स्थानकाचा चेहरामोहरा बदलून हे स्थानक ‘हायटेक’ बनणार आहे़ शासनाच्या निर्देशानुसार वेळोवळी कामात सुधारणा व बदल करण्यात येईल.
- कमलनयन मृणाल
(मुख्य वाणिज्य निरीक्षक, रेल्वे स्थानक वाशिम)