वाशिम : २.५० लाख शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 01:21 PM2019-11-16T13:21:47+5:302019-11-16T13:22:04+5:30
एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे पंचनाम्यावरून स्पष्ट झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचा फटका २ लाख ५० हजार ३५० शेतकऱ्यांना बसला आहे. एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे पंचनाम्यावरून स्पष्ट झाले असून, या नुकसानापोटी शेतकºयांना १९७ कोटी ९८ लाख ३९ हजार ८६२ रुपयांच्या निधीच्या मागणीचा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. दरम्यान, पीक नुकसानाच्या पंचनाम्यांची पुर्नपडताळणी केली जात आहे.
जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान अवकाळी पावसाने थैमान घालत पिकांचे अतोनात नुकसान केले. या नुकसानाची पाहणी कृषी व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या केली. या पाहणीनंतर प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात ७९५ गावातील २ लाख ७९ हजार ९३८ हेक्टर क्षेत्रात पीक नुकसान झाल्याचे दिसल. त्यानंतर प्रशासनाने या पंचनाम्याची पडताळणी व ‘डाटा एन्ट्री’ची प्रकिया पूर्ण केली. त्यानुसार जिल्ह्यात एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले असून, या नुकसानाचा फटका २ लाख ५० हजार ३५० शेतकºयांना बसला आहे. त्यात जिरायत, बागायत आणि फळपिकांचाही समावेश आहे. आता या शेतकºयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासनाने अहवाल तयार केला आहे. त्या अहवालानुसार नुकसानग्रस्त शेतकºयांना १९७ कोटी ९८ लाख ३९ हजार ८६२ रुपयांचे वितरण करावे लागणार आहे.
दरम्यान, कोणताही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये म्हणून प्रशासनाच्यावतीने पंचनाम्यांची पुर्नपडताळणीही करण्यात येत आहे. तथापि, ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आवश्यक सुधारणाही अहवालात केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.
अडचणी सापडलेल्या शेतकºयांकडून मदत तत्काळ जाहीर करण्याची मागणी
जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे तयार करून ‘डाटा एन्ट्री’ प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. असे असले तरी रब्बी हंगाम सुरू झाला असताना आणि शेतकºयांना पैशांची नितांत गरज भासत असताना नुकसान भरपाईची मदत अद्यापपर्यंत शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली नाही. यासंदर्भात शासन निर्णयदेखील अद्यापपर्यंत निघाला नाही. यामुळे शेतकरी पुरते संभ्रमात सापडले आहेत. तथापि, शासनाने शेतकºयांची हलाखीची स्थिती लक्षात घेऊन तत्काळ आर्थिक मदत जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधून जोर धरत आहे. या विषयाकडे जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीही विशेष लक्ष पुरविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.