वाशिम : जिल्ह्यात परतले २७ हजार नागरिक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 10:44 AM2020-03-28T10:44:25+5:302020-03-28T10:44:44+5:30
ग्रामीण भागातील २३ हजार २०९, तर शहरी भागांतील ४ हजार नागरिकांचा समावेश आहे.
- दादाराव गायकवाड
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरत असल्याने विविध कारणास्तव विदेशात, परराज्यात, महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील २७ हजार २०९ नागरिक आपापल्या परत गावी आले आहेत. त्यात ग्रामीण भागातील २३ हजार २०९, तर शहरी भागांतील ४ हजार नागरिकांचा समावेश आहे. या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
वाशिम जिल्ह्यात रोजगारांचे स्त्रोत अपुरे असल्याने प्रामुख्याने शेती कामांवरच जिल्ह्यातील बहुतांश जनतेच्या संसाराचा गाडा चालतो. त्यातही जिल्ह्यातत प्रामुख्याने कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक असल्याने खरीप हंगामानंतरच जिल्हाभरातील हजारो कामगार रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे आदी महानगरांसह गुजरात, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेशात जातात. ते आता परत येत असून, आरोग्य तपासणी केली जात आहे.
ग्रामीण भागात २३ हजार २०९ नागरिक
गेल्या आठवडाभरात पोलीस पाटलांनी घेतलेल्या माहितीनुसार सहा तालुक्यातील ग्रामीण भागांत तब्बल २३ हजार २०९ नागरिक, तर शहरी भागांत ४ हजार नागरिक परत आले आहेत.
गावाकडे नागरिकांची धाव
जिल्ह्यातील बरीच मंडळीही महानगरात किंवा विदेशात नोकरीसाठी स्थायिक झालेली आहेत. आता जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. यावर उपचारासाठी अद्याप कोणतेही औषध किंवा लसीची निर्मितीही झालेली नाही. त्यामुळे जिवाच्या भीतीने विदेशात, परराज्यात आणि राज्यातील महानगरांत गेलेल्या नागरिकांनी आपापाल्या गावी धाव घेतली आहे.
विदेशातून परतलेले ३२ नागरिक स्वस्थ
विविध कारणानिमित्त विदेशात गेलेले ३२ नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत. या सर्वांनाच होम कॉरन्टिनमध्ये ठेवण्यात आले. त्यापैकी २१ जण होम कॉरन्टिमधून बाहेरही पडले असून, आता केवळ ११ जण होम क्वॉरन्टिंनमध्ये असले तरी, एकातही कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे आढळून आली नाहीत.
अद्याप एकही संशयित नाही
गेल्या आठवडाभरात पोलीस पाटलांनी घेतलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात २७ हजार नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत. या नागरिकांची तपासणी केली असून, आजवर एकही नागरीक संशयित नाही.